महाराष्ट्रातील प्रमुख ४० मंदिरांना वार्षिक १ सहस्र कोटी रुपयांचे दान !

दक्षिणेत केवळ तिरुपती मंदिराला मिळतात १ सहस्र ५०० कोटी रुपये !

तिरुपती बालाजी मंदिराला दान

छत्रपती संभाजीनगर – देशभरात असंख्य मंदिरे आहेत. कोट्यवधी भाविक प्रतिवर्षी येथे दर्शनासाठी जातात. या मंदिरांना मोठ्या प्रमाणात दानही प्राप्त होते. याच रकमेतून सामाजिक कार्यावर व्यय करणार्‍या मंदिरांची सूची मोठी आहे. महाराष्ट्रातील प्रमुख ४० मंदिरांचा विचार केला, तर येथे प्रतिवर्षी १ सहस्र कोटी रुपयांचे दान दिले जाते. यात एकट्या शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिराचा ४०० कोटी म्हणजे ४० टक्के इतका वाटा आहे, अशी माहिती एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केली आहे. दुसरीकडे दक्षिणेतही मंदिरांची संख्या मोठी असून येथे एकट्या तिरुपती बालाजी मंदिराला वर्षाकाठी १ सहस्र ५०० कोटी रुपयांचे दान प्राप्त होते.

श्री साईबाबा मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिर यांचे कार्य !

तिरुपती बालाजी मंदिर

महाराष्ट्रातील शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर आणि आंध्रप्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिराकडून अनेक क्षेत्रांत काम केले जात आहे. विविध असाध्य रोगांवर उपचार आणि गरीब, वंचित यांसाठी विनामूल्य आरोग्यसेवा पुरवण्याच्या दृष्टीने दोन्ही मंदिरांचे काम वाखाणण्याजोगे आहे. दर्शनाला येणार्‍या भाविकांना सोयी-सुविधा देण्याच्या दृष्टीने दक्षिणेतील मंदिरे अधिक वेगाने काम करत असल्याचे दिसते.

दक्षिण भारतातील इतर मंदिरांचे कार्य !

मीनाक्षी मंदिर

तमिळनाडू राज्यातील मदुराई येथील ‘मीनाक्षी मंदिर ट्रस्ट’च्या वतीने मदुराई येथे ९१८ विद्यार्थिनींसाठी अनेक वर्षांपासून शाळा चालवली जाते. ३४ अनाथ मुलींचा सांभाळ करणारी संस्थाही चालवली जाते. मुलींचा शैक्षणिक व्यय मंदिराच्या वतीने केला जातो. ‘ऑडिव्हर ट्रेनिंग स्कूल’च्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणही देण्याचा उपक्रम राबवतात. तेलंगाणा येथील यादगिरीगुट्टा येथील लक्ष्मी-नृसिंह स्वामी मंदिर संस्थानच्या वतीने गोशाळा चालवली जाते. हरिता प्रकल्पाच्या माध्यमातून दीड कोटी रुपये व्यय करून जलपुनर्भरण कार्यक्रमावर भर देण्यात आला आहे. तिरुमलाच्या डोंगरावर जलपुनर्भरण करून १ कोटी रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. (विकास करणे, हे सरकारचे काम आहे. देवधनाचा वापर हा धर्मकार्यासाठीच व्हायला हवा, हे तमिळनाडूचे सरकार कधी लक्षात घेणार ? – संपादक) 

संपादकीय भूमिका

  • भारतात मंदिरांचे सरकारीकरण झाल्यामुळे भाविकांनी श्रद्धेने दान केलेल्या पैसा लुटला जात आहे. सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये घोटाळे झालेले आहेत. हे रोखण्यासाठी मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक !
  • हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे स्थानच उपलब्ध नाही. त्यामुळे मंदिरे ही धर्मशिक्षण देणारी केंद्रे होणे आवश्यक आहे !