मालवण : वाहनातून अवैधरित्या गोवंशियांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहरातील काही तरुणांनी सागरी महामार्गावर देऊळवाडा येथे पाठलाग करून एक ‘बोलेरो पिकअप (टेंपो)’ गाडी अडवली आणि पोलिसांना बोलावले. या गाडीत एक वासरू, एक बैल आणि एक म्हैस, अशी ३ गुरे होती. ३ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ही घटना घडली. या गाडीतून यापूर्वी २ वेळा गुरांची वाहतूक केल्याच्या प्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे समजते.
एका टेंपोमधून अवैधरित्या गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच मालवण शहरातील काही तरुणांनी पाठलाग करून हा टेंपो सागरी महामार्गावरील देऊळवाडा येथे अडवला. त्यानंतर पूर्ण बंदिस्त केलेल्या या टेंपोत ३ गुरे असल्याचे निदर्शनास आले. गाडीच्या चालकाला विचारले असता, त्याने वेगवेगळी उत्तरे दिल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी हा टेंपो पोलीस ठाण्यात नेला. ‘ही गुरे बेळगाव येथे हत्या करण्यासाठी नेण्यात येत असावीत’, असा संशय येथे उपस्थित तरुणांनी व्यक्त केला असून या ‘प्रकरणातील संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी केली आहे. या वेळी ललित चव्हाण, अनिकेत फाटक, सिद्धेश मांजरेकर, पंकज गावडे, पार्थ वाडकर, सीझर डिसोजा आदींचा समावेश होता.