अफगाण नागरिकांना मोठ्या प्रमाणात कह्यात घेत आहे पाकिस्तानी पोलीस !

  • लक्षावधी अफगाणी नागरिकांना पाकमधून हाकलण्याचा आदेश काढल्याचे प्रकरण

  • पाकिस्तानवर कारवाई करू ! – तालिबानची चेतावणी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाक सरकारने त्यांच्या देशातील लक्षावधी अफगाणी नागरिकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत मायदेशी जाण्याचा आदेश काढला होता. त्यामुळे दोन्ही देशांतील तोरखम सीमेतून अफगाणी लोक मोठ्या प्रमाणात परत जात आहेत. पाकिस्तानी पोलिसांनी पाकमध्ये अजूनही वास्तव्य करत असलेल्या अनेक अफगाणी नागरिकांना कह्यात घेतले आहे. पाक सरकारनुसार पकडण्यात आलेल्या अफगाण्यांना बलपूर्वक परत पाठवण्यात येणार आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार आतापर्यंत ६३ सहस्र अफगाणी नागरिक मायदेशी परतले आहेत.

१. या प्रकरणी तालिबानमधील परराष्ट्र खात्याचे उपमंत्री महंमद अब्बास स्टानिकजई यांनी सांगितले की, पोलिसी कारवाईच्या विरोधात आम्ही कारवाई करू. पाकिस्तानी सरकारचा हा निर्णय अयोग्य आणि अमानवीय आहे. त्याने त्याच्या निर्णयावर फेरविचार करणे आवश्यक आहे.

२. एका अनुमानानुसार पाकमध्ये १७ लाखांहून अधिक अफगाणी नागरिक रहातात. यांपैकी बहुतांश लोक अनधिकृतरित्या निवास करतात. कराची शहरातील सोहराब गोथ भागामध्ये सर्वांत मोठ्या प्रमाणात अफगाण्यांच्या झोपड्या आहेत.

३. तेथील अधिकारी अजीजुल्लाह याने सांगितले की, पलायन एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत आहे की, आम्हाला अफगाण्यांसाठी बस पुरवणे कठीण झाले आहे. काही लोकांना त्यांची घरे सोडून कँपमध्ये रहाण्यास बाध्य केले गेले आहे. अशा प्रकारे अफगाण नागरिकांना अफगाणिस्तान गाठल्यावर सर्वांत मोठी समस्या ही तेथील मुलींसाठी असेल. याचे कारण असे की, तालिबान सरकारने मुलींच्या शिक्षणावर बंदी आणली आहे.