मराठ्यांना आरक्षण देण्‍यासाठी सरकारला किती आणि कशासाठी वेळ पाहिजे, हे सांगावे ! – मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणाचे प्रकरण

आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील

जालना – मराठा आरक्षणाच्‍या मागणीसाठी आंदोलन करणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चर्चेसाठी आंदोलनाचे केंद्रस्‍थान असणार्‍या अंतरवाली सराटी येथे येण्‍याचे निमंत्रण दिले आहे. फडणवीस यांनी येथे येऊन ‘आम्‍हाला आरक्षण देण्‍यासाठी सरकारला किती आणि कशासाठी वेळ हवा आहे ?’, हे सांगावे, असे जरांगे यांनी म्‍हटले आहे. पाटील यांनी गत २ दिवसांपासून फडणवीस यांच्‍यावर टीका केली आहे; पण आता त्‍यांनीच फडणवीस यांना चर्चेला बोलावले आहे.

१. मराठा आरक्षणाच्‍या सूत्रावरून अवघ्‍या राज्‍यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी तोडगा काढण्‍यासाठी १ नोव्‍हेंबर या दिवशी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या नेतृत्‍वाखाली सर्वपक्षीय बैठक झाली.

२. या बैठकीत सर्वच पक्षांनी मराठा आरक्षणाला अनुकूल अशी भूमिका घेतली. त्‍यानंतर स्‍वतः शिंदे यांनी मनोज जरांगे यांना ‘आमरण उपोषण’ मागे घेण्‍याची विनंती केली; पण जरांगे यांनी त्‍यांची विनंती धुडकावून लावत स्‍वत:चे आंदोलन अव्‍याहत चालू ठेवण्‍याचा निर्णय घेतला.

३. मनोज जरांगे पाटील म्‍हणाले की, आम्‍ही सरकारला गत ४ दिवसांपासून चर्चेचे निमंत्रण देत आहोत; पण सरकारचे प्रतिनिधी आले नाहीत. तुम्‍हाला वेळ हवा असेल, तर मला बोलता येते तोपर्यंत चर्चेला या ! देवेंद्र फडणवीस यांनी स्‍वतः चर्चेला यावे. रस्‍त्‍यावर त्‍यांना कुणीही अडवणार नाही. माझे मराठे त्‍यांना संरक्षण देतील. सायंकाळपासून मी पाणीही सोडणार आहे. त्‍यानंतर पाहू ते मराठ्यांना कसे आरक्षण देत नाहीत ? सर्वपक्षीय बैठकीचा तपशील पहाण्‍याची माझी इच्‍छा नाही. गरिबांच्‍या पोरांना अन्‍याय सहन करावा लागत असतांना हे नेते हसण्‍यावर नेत आहेत. त्‍यांना जनतेचे पालक म्‍हणायचे का ?, असा प्रश्‍न आम्‍हाला पडला आहे.