दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पाणीटंचाईची समस्‍या तशीच !; ३४ लाख ३२ सहस्र रुपयांची फसवणूक !…

पाणीटंचाईची समस्‍या तशीच !

नवी मुंबई – मोरबे धरण भरलेले असूनही नवी मुंबई महापालिका हद्दीत अनेक ठिकाणी पाण्‍याची समस्‍या भेडसावते. ही समस्‍या दूर करण्‍यासाठी पाणीवाटपाचे नियोजनही पालटण्‍यात आले, तरीही समस्‍या सुटली नाही. ७ दिवसांत पाणीसमस्‍या न सुटल्‍यास पालिका मुख्‍यालयात ठिय्‍या आंदोलन करून उपोषण करण्‍यात येणार असल्‍याचे येथील सारसोळे गावातील माजी प्रभाग समिती सदस्‍य मनोज मेहेर यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

स्‍वातंत्र्याच्‍या ७६ वर्षांनंतरही मूलभूत सुविधा न मिळणे दुर्दैवी !


३४ लाख ३२ सहस्र रुपयांची फसवणूक !

ठाणे – एअर तिकीट नोंदणीचे काम केल्‍यावर आधी पैसे दिले; पण नंतर सायबर गुन्‍हेगारांनी पैसे देणे बंद केले. नोंदणीच्‍या कामात एका व्‍यक्‍तीची ऑनलाइनद्वारे ३४ लाख ३२ सहस्र रुपये उकळून गुन्‍हेगारांनी फसवणूक केली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

संपादकीय भूमिका

लोकहो, ऑनलाइन व्‍यवहार करतांना सतर्क रहा !


डिझेलचा काळाबाजार !

 

मालेगाव – मुंबई आग्रा महामार्गावर पोलिसांनी धाड घालून अवैधरित्‍या डिझेल आणि बायोडिझेल सदृश पदार्थाची खरेदी-विक्री आणि काळाबाजार होत असल्‍याचे उघडकीस आणले. यात डिझेल विक्री करणारा ट्रक, पिकअप आणि डिझेल असा सुमारे २० लाख १८ सहस्र ७४० रुपयांचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला. पथकाने ६ संशयितांना अटक केली असून प्रमुख आरोपी फरार आहे.

संपादकीय भूमिका 

अशांकडून हे पैसे वसूल करून घ्‍यायला हवेत !


ललित पाटीलला ७ नोव्‍हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पुणे – ससून रुग्‍णालय अमली पदार्थ प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि ड्रग्‍ज माफिया ललित पाटील याला ७ नोव्‍हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली आहे. तो सध्‍या पुणे पोलिसांच्‍या कह्यात आहे.


मुंबईतील वाढते प्रदूषण चिंताजनक ! – मुंबई उच्‍च न्‍यायालय

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – मुंबई उच्‍च न्‍यायालयाने मुंबईतील वाढते प्रदूषण अत्‍यंत चिंताजनक असल्‍याचे म्‍हटले आहे. मुख्‍य न्‍यायमूर्तींनी हवेच्‍या अल्‍प गुणवत्तेविषयी चिंता व्‍यक्‍त करत सुमोटो याचिका प्रविष्‍ट केली. न्‍यायालयाने केंद्र, तसेच राज्‍य सरकार आणि महानगरपालिका यांना प्रश्‍न विचारले. प्रदूषण रोखण्‍यासाठीच्‍या उपाययोजनांविषयीचा सविस्‍तर अहवाल सादर करण्‍याचे निर्देश न्‍यायालयाने दिले असून ६ नोव्‍हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

संपादकीय भूमिका 

याविषयी पुरोगामी काही बोलतील का ?