आनंदी, हसतमुख आणि उतारवयातही तळमळीने सेवा करणार्‍या ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या (कै.) सौ. सुलोचना नेताजी जाधव (वय ७७ वर्षे) !

२०.१०.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील सौ. सुलोचना नेताजी जाधवआजी यांचे निधन झाले. ३१.१०.२०२३ या दिवशी आजींच्‍या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्‍यानिमित्त देवद आश्रमातील साधकांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये, तसेच त्‍यांच्‍या निधनाच्‍या वेळी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

(कै.) सौ. सुलोचना जाधव

(कै.) सौ. सुलोचना नेताजी जाधव यांच्‍या संदर्भात सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे !

पू. शिवाजी वटकर

१. उतारवयातही भावपूर्ण सेवा करणे

‘साधारण ७ वर्षांपूर्वी सौ. सुलोचना जाधवआजी देवद आश्रमातील तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून आणि दिवा लावून तुळशीची पूजा करत असत. तेव्‍हा मी प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या छायाचित्राची पूजा करत असे. ‘त्‍या उतारवयातही भावपूर्ण सेवा करतात’, हे पाहून मला त्‍यांचे कौतुक वाटायचे. ‘उतारवयात भावपूर्ण सेवा कशी करावी ?’, हे मला त्‍यांच्‍याकडून शिकता आले.

२. आजींची आंतरिक साधना चालू असल्‍याचे जाणवणे

‘जाधवआजी-आजोबांचे आजारपण, अनेक कौटुंबिक समस्‍या, उतारवयातील मर्यादा’, असे असतांनाही आजींचा चेहरा नेहमी शांत आणि स्‍थिर दिसायचा. प्रत्‍येक वेळी भेटल्‍यावर त्‍या मला नम्रतेने नमस्‍कार करायच्‍या. यावरून ‘त्‍या पुष्‍कळ सकारात्‍मक आणि संयमी आहेत, तसेच त्‍यांची आंतरिक साधना सतत चालू आहे’, असे मला जाणवायचे.

३. वात्‍सल्‍यभाव

मी जेव्‍हा आश्रम परिसरात आजींना पहात असे, तेव्‍हा मला माझ्‍या आईची आठवण येत असे. माझी आई त्‍यांच्‍यासारखीच दिसत असे. मी सकाळी काही वेळा जाधवआजी-आजोबा यांच्‍या समवेत प्रसाद घेण्‍यासाठी बसत असे. आजी लहानशा स्‍टीलच्‍या डब्‍यातून आंब्‍याचा गर, केळ्‍याचे शिकरण इत्‍यादी पदार्थ घेऊन यायच्‍या. प्रत्‍यक्षात ते पदार्थ अल्‍प आणि आजी-आजोबांसाठी पुरतील, एवढेच असायचे, तरीही आजी मला त्‍यातील एक तृतीयांश भाग देऊन प्रेमाने खाऊ घालायच्‍या. त्‍या वेळी मला त्‍यांच्‍यातील वात्‍सल्‍यभाव अनुभवायला मिळायचा.

‘(कै.) सौ. सुलोचना जाधवआजींची आध्‍यात्मिक प्रगती होवो’, अशी मी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी प्रार्थना करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद. (२८.१०.२०२३)


१. श्री. कृष्‍णकुमार जामदार (वय ७२ वर्षे)

अ. ‘आजी नेहमी प्रसन्‍न, हसतमुख आणि आनंदी असत.

आ. त्‍यांचे बोलणे शांत आणि मधुर होते.

इ. ‘आजी सातत्‍याने भावावस्‍थेत असायच्‍या’, असे जाणवायचे.’

२. सौ. शुभांगी पात्रीकर (वय ७१ वर्षे)  

अ. ‘आजींना बर्‍याच औषधांची माहिती होती. ‘आजारी असतांना कोणत्‍या झाडाचे पान खाल्‍ल्‍यावर बरे वाटेल ?’, हे त्‍या सांगायच्‍या, तसेच ‘ते पान खाल्ले कि नाही ?’, याचाही पाठपुरावा घ्‍यायच्‍या.

आ. आजी रात्री २ – ३ वाजता उठून नामजप करायच्‍या. त्‍या सतत श्रीकृष्‍णाच्‍या अनुसंधानात रहाण्‍याचा प्रयत्न करायच्‍या.’

३. श्रीमती रुक्‍मिणी पोशे (वय ७० वर्षे) आणि सुश्री (कु.) मनीषा पोशे    

अ. ‘आजी साधक आणि त्‍यांचे नातेवाईक यांची प्रेमाने विचारपूस करत असत.’

४. आधुनिक वैद्य अशोक तांबेकर (वय ६९ वर्षे) 

४ अ. आजींच्‍या अंतिम दर्शनाच्‍या वेळी जाणवलेली सूत्रे

१. ‘कै. (सौ.) जाधवआजींच्‍या अंतिम दर्शनाला गेल्‍यावर त्‍यांच्‍या पायांच्‍या बाजूला उभे राहिल्‍याक्षणी माझा ‘निर्विचार’, हा नामजप आपोआप चालू झाला.

२. त्‍यांच्‍या पार्थिवाला प्रदक्षिणा घालतांना माझा नामजप भावपूर्ण होत होता. यापूर्वी माझा असा भावपूर्ण नामजप कधीच झाला नव्‍हता.’

५. श्री. केशव वाळके (वय ६७ वर्षे) 

५ अ. प्रत्‍येक साधकाशी बोलतांना हसतमुखाने ‘नमस्‍कार !’, असे म्‍हणणे : ‘आजींना जेवणाचा डबा द्यायला गेल्‍यावर त्‍या प्रत्‍येक वेळी मला हसतमुखाने नमस्‍कार करत असत. त्‍या प्रत्‍येक साधकाशी बोलतांना ‘नमस्‍कार !’, असे म्‍हणत असत. त्‍यांचा तो नमस्‍कार पाहून मला संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्‍या पुढील ओवीची आठवण होत असे.

जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत । हा भक्‍तियोगु निश्‍चित । जाण माझा ॥ – ज्ञानेश्‍वरी, अध्‍याय १०, ओवी ११८

अर्थ : भगवान श्रीकृष्‍ण अर्जुनाला सांगतात, ‘जो जो प्राणी दिसेल, तो तो ‘प्रत्‍यक्ष परमात्‍मा आहे’, असे समजावे. ‘हा माझा भक्‍तीयोग आहे’, असे निश्‍चित समज.’

६. श्रीमती शशिकला भगत (वय ६७ वर्षे)

६ अ. यजमानांची सेवा मनापासून करणे : मागील काही मासांपासून आजींचे यजमान श्री. नेताजी जाधवआजोबा (आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के, वय ८३ वर्षे) रुग्‍णाईत असल्‍यामुळे आजी यजमानांसाठी खोलीत प्रसाद आणि महाप्रसाद नेत असत. त्‍या अगदी मनापासून आजोबांची सेवा करत असत, तसेच वैयक्‍तिक सर्व आवरून त्‍या जपमाळ बनवण्‍याची सेवा करण्‍यासाठी येत असत.

६ आ. त्‍यांच्‍या चेहर्‍यावर कधीही थकवा नसायचा. त्‍या नेहमी शांत आणि स्‍थिर असायच्‍या.’

७. सौ. प्रतिभा सहस्रबुद्धे (वय ६६ वर्षे)

७ अ. सहसाधिका रुग्‍णाईत असतांना तिची प्रेमाने काळजी घेणे : ‘आजी आणि मी काही कालावधीसाठी एकाच खोलीत रहात होतो. त्‍या वेळी माझा उजवा हात पुष्‍कळ दुखत होता. तेव्‍हा आजी माझे कपडे धुवायच्‍या. एकदा मी आजींना म्‍हणाले, ‘‘मी तुमची सेवा करायला हवी.’’ तेव्‍हा आजी मला म्‍हणाल्‍या, ‘‘तुम्‍ही माझी लहान बहीण आहात. मोठ्या बहिणीने लहान बहिणीची सेवा केली, तर काय झाले ? तुम्‍ही कशाचा ताण घेऊ नका.’’

८. सौ. राधा साळोखे

८ अ. आजी रुग्‍णाईत असतांना त्‍यांची आंतरिक साधना चालू असल्‍याचे जाणवणे : मधल्‍या काळात त्‍यांचे मोठे शस्‍त्रकर्म झाले होते. त्‍या वेळी त्‍यांना पुष्‍कळ शारीरिक त्रास होत होते; पण त्‍यांच्‍या चेहर्‍यावरील तेज पुष्‍कळ वाढले होते. ‘त्‍या कालावधीत त्‍यांची आंतरिक साधना वेगाने चालू होती’, असे मला जाणवले.

८ आ. आजींच्‍या निधनाच्‍या वेळी आणि त्‍यांचे निधन झाल्‍यानंतर जाणवलेली सूत्रे

१. आजींच्‍या शेवटच्‍या क्षणी मी त्‍यांच्‍या समवेत होते. त्‍या दिवशीसुद्धा त्‍या सेवेला जाण्‍यासाठी खोलीतून निघाल्‍या होत्‍या.

२. आजींना अकस्‍मात् पुष्‍कळ त्रास होऊ लागला. मी त्‍यांच्‍या खोलीत गेले होते. तेव्‍हा आधुनिक वैद्य त्‍यांना तपासत होते. त्‍यांचा तोल जाऊ लागला. ‘त्‍या पडू नयेत; म्‍हणून मी त्‍यांना धरून बसले होते. आजी एवढ्या तीव्र वेदनांच्‍या स्‍थितीत ‘ॐ’, हा नामजप करण्‍याचा तळमळीने प्रयत्न करत होत्‍या. नामजप करत असतांना त्‍यांचे निधन झाले.

३. त्‍यांच्‍या निधनाच्‍या वेळी मला पुष्‍कळ शांत वाटत होते. त्‍या वेळी मला सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांचे अस्‍तित्‍व जाणवत होते.

४. ‘आजींचा उच्‍च लोकाचा प्रवास वेगाने चालू आहे आणि परम पूज्‍य त्‍यांना पुढील प्रवासासाठी नेत आहेत’, असे मला जाणवले.

५. ‘परम पूज्‍य मृत्‍यूनंतरही आपली काळजी घेतात’, हे अनेक वेळा ऐकले होते; पण आजींच्‍या मृत्‍यूच्‍या वेळी मला हे प्रत्‍यक्ष अनुभवता आले.

६. निधनानंतर आजींचा चेहरा अधिक तेजस्‍वी झाला होता.

९. सौ. जया साळोखे (आध्‍यात्मिक पातळी ६० टक्‍के, वय ४१ वर्षे) आणि सौ. स्‍मिता नाणोसकर

‘आजींच्‍या निधनानंतर त्‍यांना अंघोळ घालणे, साडी नेसवणे’ इत्‍यादी कृती करत असतांना ‘त्‍या शांत झोपल्‍या आहेत’, असे आम्‍हाला वाटत होते. तेथे पुष्‍कळ चैतन्‍य जाणवत होते.’

१०. सौ. संध्‍या जामदार (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के, वय ७० वर्षे)

‘निधन होण्‍याच्‍या २ दिवस आधीपासून त्‍यांच्‍या चेहर्‍यावर तेज दिसत होते.’

११. कु. विद्या विलास गरुड

११ अ. उतारवयातही उत्‍साही असणे : ‘मी वर्ष २०१२ मध्‍ये देवद आश्रमात पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी आले. त्‍या वेळी सौ. सुलोचना जाधवआजी आणि मी एकाच खोलीत निवासाला होतो. उतारवयातही आजींचा उत्‍साह टिकून होता. ‘कोणतीही सेवा सांगितल्‍यावर त्‍या ‘नाही’ म्‍हणत नसत.

११ आ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे

१. निधनानंतर आजींची सेवा करतांना मी देवाला प्रार्थना केली, ‘मी संतसेवा करत आहे’, असा भाव ठेवून मला सेवा करता येऊ दे.’ त्‍यामुळे माझ्‍याकडून ती सेवा सहजतेने झाली.

२. आजींचे पार्थिव हलके जाणवत होते.

३. आजींचा चेहरा आणि हात यांची त्‍वचा पिवळी दिसत होती.

(सर्व सूत्रांचा दिनांक : २६.१०.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक