हमासने प्रसारित केला ओलीस ठेवलेल्यांपैकी ३ इस्रायली माहिलांचा व्हिडिओ !
तेल अविव (इस्रायल) – ‘तुम्ही आम्हा सर्वांना मुक्त करायला हवे होते. तुम्ही आम्हा सर्वांना मुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहात; पण त्याऐवजी आम्ही तुमचे राजकीय, सुरक्षा, सैनिकी आणि राजनैतिक अपयश सहन करत आहोत. हमासच्या प्राणघातक आक्रमणापासून इस्रायली नागरिकांचे संरक्षण करण्यात आणि त्यांना मायदेशी आणण्यात नेतान्याहू अयशस्वी ठरले आहेत’, अशी इस्रायलवर टीका करणारा इस्रायली ओलिसांचा एक व्हिडिओ हमासने प्रसारित केला आहे. याखेरीज त्यांनी पॅलेस्टिनी बंदीवानांच्या बदल्यात ओलिसांची सुटका करण्यासाठी करार करण्याची मागणी केली आहे. या व्हिडिओला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ‘अमानुष मनोवैज्ञानिक प्रचार’ असे संबोधले आहे.
हमासने प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये ३ महिला ओलीस बोलतांना दिसत आहेत. ७ ऑक्टोबरपासून त्या हमासच्या कैदेत आहेत. ट्रुपानोब, डॅनिएल अलोनी आणि रिमोन किर्ष्ट अशी या महिलांची नावे आहेत. एका बंद खोलीत खुर्चीवर त्या बसलेल्या आहेत. हा व्हिडीओ समोर येताच बेंजामिन नेतान्याहू एका निवेदनात म्हणाले की, ओलिसांना लवकरच मायदेशी आणणार आहोत. हमासने अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांप्रती आमच्या संवेदना आहेत. आम्ही सर्व बंदीवान आणि बेपत्ता लोक यांना घरी आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत.