जग २१ व्या शतकाकडे वाटचाल करत असतांना शहरीकरण, नागरीकरण यांच्या समवेत पर्यावरण असंतुलन आणि प्रदूषण यांचे गंभीर संकट उभे आहे. आजच्या जगात वायूप्रदूषण ही एक मोठी चिंताजनक गोष्ट आहे. लोकांना प्रतिदिन त्याचा सामना करावा लागत आहे. जगातील कोणत्याही ठिकाणी असलेल्या प्रदूषणापेक्षा १० पट अधिक प्रदूषण उत्तर भारतात आहे. ‘हे प्रदूषण वाढत असून त्यामुळे भारतातील लोकांचे आयुष्य अडीच ते १० वर्षांनी अल्प होऊ शकते’, असा अंदाज शिकागो विद्यापिठाने संशोधनाद्वारे व्यक्त केला आहे. जगातील सर्वाधिक पहिल्या १० प्रदूषित शहरांत मुंबईचा दुसरा क्रमांक आहे. देहली आणि मुंबई ही दोन्ही शहरे आधीपासूनच प्रदूषित शहरे म्हणून ओळखली जात होती. २८ ऑक्टोबर २०२३ या दिवशी मुंबईने हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात ३०० ची पातळी गाठून देहलीला मागे टाकल्याने मुंबईचे नाव ‘सर्वाधिक प्रदूषित शहर’ म्हणून नोंदले गेले आहे. गेल्या ४ वर्षांचा विचार केला, तर मुंबई आणि पुणे ही शहरे भारतातील सर्वाधिक प्रदूषणाच्या सूचीत आलेली आहेत.
प्रदूषणामुळे होणारे गंभीर आजार !
पुणे आणि मुंबई येथील नागरिकांना या प्रदूषणामुळे दमा, कर्करोग, बेशुद्ध पडणे, घसा खवखवणे, डोळ्यांतून पाणी येणे आदी आजारांना सामोरे जावे लागत आहे. प्रदूषणामुळे डोके, गळा, नाक, फुप्फुस, श्वसननलिका यांच्याशी संबंधित आजार होतात. रोगप्रतिकारशक्ती अल्प होते. मानसिक आजार होतो आणि जननक्षमतेवर परिणाम होतो, असे अभ्यासात आढळून आले आहे. नागरीकरणामुळे सुबत्ता येऊन देश श्रीमंत होऊन देशाची आर्थिक प्रगती होत असली, तरी प्रदूषणाच्या या गंभीर परिणामांमुळे लोकांचे जीव जात आहेत, याचा कधी विचार होणार ? गेल्या २ वर्षांत मुंबई येथील वायूप्रदूषणामुळे जवळपास १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तसेच वायूप्रदूषणामुळे लोकांचा जीवच नाही, तर ‘ग्रीनपीस’ या आंतरराष्ट्रीय पर्यावरणविषयक संस्थेच्या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार आर्थिक फटकाही बसत आहे.
शहरांतील हवा प्रदूषित होण्यामागील कारणे !
देशातील सर्व प्रमुख शहरांतील हवेचे प्रदूषण वाढण्याचे पहिले कारण, म्हणजे नैसर्गिक वातावरणात होणारा पालट ! गेल्या ४ वर्षांपासून वातावरणातील पालट हे प्रदूषण वाढण्यास मुख्य कारण असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. नैसर्गिक पालट, वाढते उद्योग आणि वाहनांची वाढती संख्या या कारणांमुळे मुंबई अन् परिसरात हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. जसजशी शहरे वाढत जातात, त्या प्रमाणात गलिच्छ वस्त्यांची संख्या आणि आकार वाढत जात आहे. या वस्त्यांमध्ये लोक दाटीवाटीने रहातात. त्यामुळे पर्यावरण आणि प्रदूषण यांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. औद्योगिक प्रदूषण, डिझेल, पेट्रोल, गॅस, कोळसा ज्वलन, वाहनांची वाढती संख्या, दळणवळणांची साधने, बांधकामे, वाहतूक, कचरा जाळणे यांतून प्रदूषण वाढत आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे खासगी वाहनांची संख्याही वाढली आहे. पुणे शहरातील केवळ १९ टक्के नागरिक प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात, तर ८१ टक्के नागरिक हे खासगी वाहनांचा वापर करतात. त्यातही एका वाहनात एकच प्रवासी असण्याचे प्रमाणही अधिक आहे. शहरात स्थापन झालेल्या आस्थापनांमध्ये सिद्ध होणारा ‘कार्बन डायऑक्साईड’ हा विषारी वायू सोडण्यासाठी चिमण्या उभारण्यात आल्या आहेत. सरकारी नियमानुसार या चिमण्यांची उंची सर्वसाधारण ९० ते १२० फूट असणे आवश्यक आहे; परंतु येथील चिमण्यांची उंची केवळ ७० ते ८० फूट किंवा त्याहून अल्प असल्याचे आढळून आले आहे. मानवाने त्याच्या सोयीसाठी अरण्यांची तोड केली आहे. त्यामुळे वायूप्रदूषण वाढले आहे. झाडे सतत वातावरणातील प्रदूषण अल्प करण्याचे काम करतात. आपल्या अन्नासाठी हानीकारक वायू ‘कार्बन डायऑक्साईड’ शोषून घेऊन वनस्पती जीवनदायी प्राणवायू (ऑक्सिजन) प्रदान करतात.
प्रदूषण गांभीर्याने रोखणेे आवश्यक !
देशातील १०२ शहरांमध्ये प्रदूषण अल्प करण्याविषयी उपाययोजना केल्या जात आहेत; मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे विविध राज्य सरकारांनीही यात प्रभावीपणे आपले योगदान दिलेले नाही. वायूप्रदूषण नियंत्रित करणारी प्रभावी उपकरणे कारखान्यात लावण्यासाठी सरकारी यंत्रणेने उद्योग क्षेत्राला भाग पाडले पाहिजे. राजकीय इच्छाशक्ती आणि सरकारी यंत्रणा, प्रशासन, उद्योग क्षेत्र आणि सर्वसामान्य लोक यांचा सहभाग याद्वारे या गंभीर समस्येवर परिणामकारक तोडगा शक्य आहे. महानगरपालिका आणि प्रशासन यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे, दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचा वापर अल्प करणे, एका व्यक्तीसाठी चारचाकी वाहन न वापरता बस अथवा लोकल रेल्वेने बाहेर जाणे, जवळच्या ठिकाणी जायचे असल्यास सायकलचा वापर करणे आदी गोष्टी केल्यास काही प्रमाणात वायूप्रदूषण अल्प होईल. याचसमवेत झाडांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. होमहवन केल्यास परिसरातील वायू शुद्ध होत असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झालेले आहे. त्यामुळे अनेक शहरांत ठिकठिकाणी मंदिरांत होमहवन केल्यास वातावरणात सात्त्विकता निर्माण होण्यासमवेतच प्रदूषणही अल्प होऊ शकते. प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने युद्ध स्तरावर उपाययोजना आखणे आवश्यक आहे. अधिक धूर सोडणारी आणि कालबाह्य झालेली वाहने जप्त केली पाहिजेत. प्रक्रिया न करता हवेत विषारी वायू सोडणार्या कारखान्यांवर निर्बंध घातले पाहिजेत. आण्विक चाचण्या आणि रासायनिक शस्त्रे यांच्या वापरावर जगभरात बंदी आणावी. सणांमध्ये फटाक्यांचा वापर टाळावा. वायूप्रदूषणावर लवकरात लवकर उपाययोजना करणे आवश्यक आहे. उद्यासाठी आपण आजच उपाययोजना करायला हवी !
‘प्रदूषण दूर करून हवी आहे शुद्ध हवा’, हा संकल्प सर्वांनी करणे आवश्यक !