खडकवासला (जिल्हा पुणे) – येथील महापालिकेच्या शाळेत पुरेसे शिक्षक न दिल्याने शाळाच बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पालकांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांना निवेदन दिले आहे. शिक्षक द्या, अन्यथा ३१ ऑक्टोबरला शाळेला टाळे लावण्याची चेतावणी पालकांनी दिली आहे.
वारजेतील के. शामराव श्रीपती बराटे १६१ बी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सध्या १ ली ते ७ वीच्या प्रत्येकी २ तुकड्या आहेत. त्यासाठी १४ शिक्षकांची आवश्यकता आहे. सध्या कायम ३, तर कंत्राटी ५ असे ८ शिक्षक आहेत. या शाळेच्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत १७ विद्यार्थी पात्र झाले. ३ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता सूचीत स्थान मिळवले. यामुळे पालिकेची मान उंचावली आहे. व्यवस्थापन समितीने पालिका उपायुक्त राजी नंदकर यांना आंदोलनाचे निवेदन दिले आहे. त्यांनी पालकांना १५ दिवसात शिक्षक देतो, असे सांगून शेवटी तात्पुरता एक शिक्षक दिला आहे.
यावर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सविता भुसेकर यांनी सांगितले की, शाळेत ४८१ विद्यार्थी असल्याने कायद्यानुसार १६ शिक्षक आणि पात्र मुख्याध्यापक पाहिजेत. शाळेत केवळ ८ शिक्षक आहेत. आणखी ६ शिक्षक आणि पात्र मुख्याध्यापक द्या, अशी मागणी आहे. शिक्षक न मिळाल्याने ३१ ऑक्टोबरला आंदोलन होणार आहे.
संपादकीय भूमिकाअशी चेतावणी का द्यावी लागते ? शिक्षण विभाग काय करतो ? स्वतःहून लक्ष देऊन त्यामध्ये पालट का करत नाही ? शिक्षक अल्प असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या झालेल्या हानीचे दायित्व कोण घेणार ? |