|
नवी देहली – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना ‘शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबरपूर्वी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निर्णय ३१ जानेवारीआधी घ्या’, असे निर्देश दिले आहेत. आमदार अपात्रतेप्रकरणी होणार्या दिरंगाईविषयी त्यांनी खेद व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘विधानसभा अध्यक्ष एवढा वेळ लावणार असतील, तर आम्हाला आमदारांच्या पात्रता किंवा अपात्रतेचा निर्णय घ्यावा लागेल. अशी वेळ आमच्यावर येऊ देऊ नका.’’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचे दायित्व सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवले आहे; पण त्याची कार्यवाही करण्यास महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर दिरंगाई करत असल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यातही विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट यांनी केला आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केलेेल्या याचिकेवर ३० ऑक्टोबर या दिवशी सुनावणी झाली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाच्या समोर याची सुनावणी झाली.