दानवाचे उदात्तीकरण कशासाठी ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी सांगोळा (जिल्हा अकोला) येथील रावणाच्या मंदिरात सभागृहाच्या बांधकामासाठी आमदार निधीतून २० लाख रुपये दिले आहेत. रावणाच्या दहन परंपरेला त्यांनी विरोध केला आहे. ‘दशानन रावणात अनेक दुर्गुण निर्माण झाले होते; पण त्यापूर्वी तो एक शिवभक्त होता; म्हणून सांगोळा गावात रावणदहनाच्या ऐवजी त्याची पूजा केली जाते. काही भागात आदिवासी बांधवांमध्येही रावणाला ‘देव’ मानतात. ‘महाराष्ट्राच्या आगामी हिवाळी अधिवेशनात ‘रावणदहनाच्या विरोधात शासन निर्णय व्हावा’, यासाठी प्रस्ताव मांडणार आहे’, असे मिटकरींनी सांगितले. प्रत्यक्षात रावण हा ब्राह्मण होता. आदिवासी नव्हता. ‘साम्यवादी विचारसरणीच्या काहींनी भारतीय समाजात फूट पाडण्यासाठी पसरवलेले हे षड्यंत्र आहे’, हे लक्षात घेतले पाहिजे.

प्रभु श्रीरामांनी त्रेतायुगात अन्यायी आणि अधर्मी राजा रावण याचा वध केला. या ऐतिहासिक घटनेतून प्रेरणा मिळावी, तसेच दुर्जनतेच्या नाशाचे प्रतीक म्हणून प्रतिवर्षी भारतातील अनेक भागांत शेकडो वर्षांपासून रावणदहन करण्याची परंपरा निर्विवादपणे चालू आहे. त्यामुळे त्याचे विनाकारण राजकारण करून त्याला कुणी जातीय स्वरूप देऊ नये. देव सोडून दानवाचे उदात्तीकरण करणारे लोकप्रतिनिधी समाजात असतील, तर समाजाला योग्य दिशा कशी मिळणार ? श्रीरामांनी रावणाचा वध म्हणजे दुर्गुणांचाच नाश केला होता. या दुष्प्रवृत्तींचा नाश आजही होण्याची आवश्यकता आहे. रावणातील दुष्ट प्रवृत्तींचे अनुकरण होऊ नये, अशा दुष्प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळू नये म्हणून ही परंपरा चालू ठेवण्याची आवश्यकता आहे. आज महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. ‘महिलांशी असभ्य वर्तन करणारी दुष्प्रवृत्ती बोकाळलेली असतांना अशा कृतीसाठी एका आदर्श राजाकडून काय शिक्षा होते ?’ हे कळण्यासाठी रावणदहनाच्या परंपरेतून शिकता येते. ‘रावणाचे समर्थन म्हणजे चुकीच्या विचारांचे, दुर्गुणांचे, दुष्ट प्रवृत्तीचे, समर्थन आहे’, हे लक्षात घेतले पाहिजे ! रावणाच्या विद्वत्तेचे काही प्रमाणात दर्शन ‘रावणसंहिता’ या ग्रंथात घडते. त्याची माहिती आयुर्वेदाच्या अभ्यासात आहे. हा प्राचीन परंपरेचा भाग आहे. याचा अर्थ रावणाचे उदात्तीकरण करावे, असा होत नाही. केवळ प्रसिद्धीसाठी लोकप्रतिनिधी हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळत आहेत, हे लक्षात घेऊन हिंदूंनी याचा निषेध केला पाहिजे !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे.