साधना आणि आध्यात्मिक गोष्टी यांची आवड असणारा ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा भाग्यनगर (तेलंगाणा) येथील कु. बलराम वेंकटापूर (वय ६ वर्षे) !

२४.१०.२०२३ (विजयादशमी) या दिवशी कु. बलराम वेंकटापूर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६ वर्षे) याचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्याच्या आई-बाबांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. बलराम वेंकटापुर
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. बलराम वेंकटापूर महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के  झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले  

१. स्वतःची कामे स्वतः करणे

श्री. प्रसन्ना वेंकटापूर

‘बलराम सकाळी उठताच स्वतःहून ‘कराग्रे वसते लक्ष्मी ..’ इत्यादी श्लोक म्हणतो. दात घासणे, स्नान करणे, भोजन करणे इत्यादी कामे तो स्वतःच करण्याचा प्रयत्न करतो.

२. सहनशीलता

एके दिवशी बलरामला ३ – ४ वेळा उलट्या झाल्या. तो अस्वस्थ होता; परंतु तरीही ‘त्याला उलटी होणार आहे’, असे वाटल्यास तो स्वतःहून प्रसाधनगृहात जाऊनच उलटी करत होता. तो ‘अंथरुणावर किंवा खोलीमध्ये उलटी होणार नाही’, याची दक्षता घेत होता.

३. ऐकण्याची आणि विचारण्याची वृत्ती

त्याला घरातील लहान लहान कामे सांगितल्यावर तो ती करतो. आम्हाला विचारूनच तो भ्रमणभाष घेतो आणि दूरचित्रवाणी पहातो.

४. नेतृत्व गुण

सौ. श्रीवैष्णवी तेजस्वी प्रसन्ना वेंकटापूर

एके दिवशी आमच्या घरी १० ते १५ नातेवाईक आले होते. ते सर्व जण व्यावहारिक आणि इतर गोष्टींवर बोलत होते. त्या वेळी बलरामने घरात असलेले वर्तमानपत्र घेतले. त्यामध्ये श्रीरामनवमीचे विज्ञापन होते.  बलरामने सर्वांच्या मध्ये उभे राहून त्यांना सूचना दिली आणि सर्वांकडून ‘जय श्रीराम ।’ आणि ‘राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की ।’, अशा घोषणा म्हणवून घेतल्या. बलरामच्या या कृतीनंतर घरी आलेले नातेवाईक बाकीच्या गोष्टी विसरून ‘मुलांना आध्यात्मिक विषय शिकवणे’, या विषयावर चर्चा करू लागले.

५. साधनेचे प्रयत्न

बलराम प्रतिदिन बसून १५ ते २० मिनिटे नामजप करतो. तो प्रतिदिन सायंकाळी रामरक्षा आणि हनुमानचालिसा म्हणतो, तसेच तो भगवद्गीतेतील श्लोक म्हणायला शिकत आहे.

६. चुकांप्रती गांभीर्य

त्याच्या चुका लक्षात आणून दिल्यावर तो त्वरित क्षमा मागतो. तो कधी कधी त्याच्या बाबांच्या साहाय्याने स्वतःची चूक फलकावर लिहिण्याचा प्रयत्न करतो.

७. सूक्ष्मातील समजणे (कुटुंबियांना त्रास होतांना त्यांच्यासाठी आध्यात्मिक उपाय करणे)

एके दिवशी माझ्या (बलरामचे बाबा श्री. प्रसन्ना यांच्या) पाठीत फार दुखत होते; परंतु बलरामला ते ठाऊक नव्हते, तरीही तो स्वतःहून आला आणि त्याने माझी पाठ दाबून दिली. काही वेळानंतर माझी पाठदुखी न्यून झाली. तसेच घरातील कुणालाही आध्यात्मिक त्रास होतांना तो स्वतःहून विभूती आणून त्यांना लावतो.

८. आध्यात्मिक ग्रंथांच्या ज्ञानाविषयी जिज्ञासा आणि इतक्या लहान वयातही काही स्तोत्रे तोंडपाठ करणे

बलराम ‘पौराणिक कथा, भगवद्गीता, विष्णुसहस्रनाम, हनुमानचालिसा, प.पू. भक्तराज महाराज यांची भजने, रामरक्षास्तोत्र इत्यादी पुस्तके मन लावून वाचतो. पौराणिक चित्रे असलेली पुस्तके घेऊन त्यातील कथा त्याला सांगावी’, असा आमच्याकडे हट्ट करतो. बलरामला आता रामरक्षास्तोत्र, हनुमानचालिसा आणि विष्णुसहस्रनाम संपूर्ण तोंडपाठ आहे. तो आता भगवद्गीतेतील काही श्लोक म्हणायला शिकत आहे.

९. आध्यात्मिक खेळ खेळणे

बलरामला एखादी आध्यात्मिक गोष्ट सांगितल्यावर त्यानुसार कुटुंबियांसह खेळण्यात त्याला पुष्कळ आनंद मिळतो, उदा. तो स्वतः वासुदेव होऊन श्रीकृष्णाची लहान मूर्ती आपल्या डोक्यावर ठेवून यमुना नदी पार करण्याचा खेळ खेळतो. तो स्वतः हनुमान बनतो आणि मला (वडील श्री. प्रसन्ना यांना) लक्ष्मण बनायला सांगतो. त्यानंतर संजीवनी बुटी आणून माझ्यावर उपचार करतो.

१०. सतर्कता

सौ. श्रीवैष्णवी तेजस्वीचे (चि. बलराम याच्या आईचे) वडील पूजा करतांना कधी कधी काही श्लोकांचा उच्चार चुकीचा करतात, तेव्हा बलराम त्यांना तेथेच थांबवून तो श्लोक योग्य उच्चारासह म्हणण्याचा आग्रह धरतो.

११. प्रेमभाव

एके दिवशी त्याची पणजी घरी आली होती. पणजीला चालतांना आधार आवश्यक असतो; म्हणून बलराम स्वतःहून तिला काठी आणून द्यायचा. बलरामला दिलेला खाऊ तो सर्वांना वाटतो.

१२. सेवेची तळमळ

वर्ष २०२३ मधील गुरुपौर्णिमेच्या सेवेसाठी आम्ही त्याला घेऊन गेलो होतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला (प्रसन्नाला) भोजनव्यवस्थेची सेवा मिळाली होती. दुपारी १२ वाजल्यापासून रात्री ९.३० वाजेपर्यंत तो माझ्यासह आणि थोडा वेळ इतर साधकांसह राहून सेवा करत होता. तो साधकांशी बोलत होता. बलराममुळे कोणाच्याही सेवेत काही अडथळा आला नाही. सर्वसामान्यपणे तो प्रतिदिन दुपारी झोपतो; परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याला झोप किंवा भुकेचीही जाणीव नव्हती. त्याने थोडेच खाल्ले आणि अधिक वेळ साधकांच्या समवेत राहून सेवा केली.

१३. पूर्वीच्या तुलनेत बलरामच्या चेहर्‍यावर तेज अधिक दिसून येते. त्याची ‘प्रगल्भताही वाढली आहे’, असे आम्हाला जाणवते.’

– सौ. श्रीवैष्णवी तेजस्वी वेंकटापूर (बलरामची आई) आणि श्री. प्रसन्ना वेंकटापूर (बलरामचे बाबा), भाग्यनगर, तेलंगाणा.(१०.९.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक