१. रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी शेतात जातांना मनात थोडेतरी भय जाणवणे
‘मी घरी असतांना मला आठवड्यातून तीन दिवस रात्रभर शेतीला पाणी द्यायला जावे लागते; कारण विहिरीवरील पाण्याचा पंप चालवण्यासाठी लागणारा विद्युत् पुरवठा रात्री ११.३० नंतर चालू होत असे. मी एकटाच शेतात असायचो. शेत निर्जन होते. दोन्ही बाजूंनी ऊसाची शेती आहे. रात्री विजेरीच्या उजेडात शेताला पाणी द्यावे लागत होते. पूर्वी मला रात्री जायचे म्हटले की, झोप यायची आणि मनात थोडे भयही वाटायचे. त्यामुळे शेताला पाणी लावण्यासाठी माझी टाळाटाळ होत असे.
२. सर्प, विंचू किंवा हिंस्र प्राणी हे कधीही न दिसणे आणि गुरुदेवांची कृपादृष्टी सदैव जाणवणे
वडिलांना त्या वेळी थंडीचा त्रास होत असल्याने मला रात्रभर पाणी देण्यासाठी रात्री ११ ते सकाळी ८.३० या कालावधीत जावे लागत होते. रात्रीच्या वेळी विंचू, सर्प, लांडगे, कोल्हे, रानडुक्कर यांची भीती असते. मात्र तीन मासांच्या कालावधीत प्रत्येक रात्री नारायणस्वरूप गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला कधीही या गोष्टींची आठवणही आली नाही किंवा मनाला भय वाटले नाही. या कालावधीत कधीही मला विंचू, सर्प किंवा अन्य प्राणी दिसले, असे झाले नाही. रात्रीच्या वेळी दगडातून, गवतातून आणि शेतातील पिकातून जावे लागे; पण ‘परात्पर गुरुदेवांची कृपादृष्टी सातत्याने आपल्यावर आहे’, हे मनावर देवानेच बिंबवले असल्याने मनात कोणतीही चिंता किंवा भय नव्हते. पूर्ण रात्रभर शेतात असतांना ‘रात्र कधी संपली’, याची जाणीवच मनाला होत नसे.
३. देवच प्रत्येक कृती करत आहे, याची जाणीव मनाला सतत असणे
दिवसभरात शेतातील काम चालू केल्यावर नामस्मरण व्हायचे, तसेच रात्रीही हे स्मरण चालू रहायचे. ‘सर्व देवच करत असून माझा देह निमित्तमात्र या ठिकाणी रात्रीच्या वेळी शेताला पाणी देण्याची सेवा करत आहे’, ही जाणीव मनाला सतत असायची. देव करत आहे आणि ‘तो करवून घेऊन माझ्या समवेत सातत्याने त्याचे अस्तित्व आहे’, हे लक्षात यायचे. परात्पर गुरुदेवांनी गेली २० वर्षे साधनेचे जे संस्कार केले, त्यामुळे मनाची भयविरहित स्थिती निर्माण झाली. कोणत्याही कठीण प्रसंगात जरी प्रारंभी मन विचलित झाले, तरी ते गुरुकृपेमुळे आपोआप स्थिर होते आणि अनुसंधान साधता येते, याची जाणीव देवाने मला करून दिली.
‘देवा, तुझ्या कृपेविना हे सर्व जीवनच अपूर्ण आहे. देवा, जीवन पूर्णत्वाला नेण्यासाठी तुझ्या चरणांची धूळ म्हणून सदोदित आम्हाला तुझ्या चरणी ठेव, हीच तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’
– श्रीमन्नारायणमस्तु
श्री. अविनाश जाधव (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |