१. ‘गुरुदेव ब्रह्मोत्सवात साधकांना शक्ती आणि चैतन्य प्रदान करणार आहेत’, असे वाटणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी साधकांना गोवा येथे जायचे आहे’, असे मला समजले. त्या वेळी माझ्या मनात ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) एकाच वेळी सर्व साधकांचा उद्धार करणार आहेत’, असा विचार आला. ‘गुरुदेव या सोहळ्यात ‘साधकांचे आपत्काळात रक्षण व्हावे’, यासाठी त्यांना शक्ती आणि चैतन्य प्रदान करणार आहेत’, असेही मला वाटत होते.
२. ‘गुरुदेव ब्रह्मोत्सवाच्या सेवेच्या माध्यमातून साधकांची साधना करून घेत आहेत’, असे जाणवणे
मी सोहळ्याच्या ठिकाणी भव्य-दिव्य पटांगण आणि सभामंडप पाहिला. त्या वेळी मला वाटले, ‘गुरुदेव या सेवेच्या माध्यमातून अनेक साधकांची साधना करून घेत आहेत आणि या सेवेच्या माध्यमातून साधकांची आध्यात्मिक उन्नती होत आहे. साक्षात् श्रीविष्णूच्या ब्रह्मोत्सवाची सेवा करण्यास मिळणे’, ही साधकांची पूर्वजन्माची साधना आहे.’
३. राजकारणी करत असलेला कार्यक्रम आणि साधक साजरा करत असलेला ब्रह्मोत्सव यांत जाणवलेला भेद
राजकारणी लोक आणि मंत्री मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे करतात; कारण त्यांच्या हातात सत्ता असते. ते सत्तेचा वापर करून कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांना पैशाची कमतरता नसते. त्यांचा केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यांना थोडा काळच त्यातील आनंद घेता येतो.
ब्रह्मोत्सव म्हणजे आनंदाने पाझरणारा गुणांचा झराच होता. तो अनेक गुणांचा समुच्चय असलेला आनंद सोहळा होता. या आनंद सोहळ्यात आम्ही साधक भक्तीने ओलेचिंब झालो होतो. प्रत्येकाच्या हृदयात गुरुदेवांचे स्थान प्रस्थापित झाले होते.
४. ब्रह्मोत्सवात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
अ. ‘साधक पांढरा पोशाख परिधान करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले बसलेला रथ ओढत आहेत’, हे पाहून माझ्या मनात विचार आला, ‘या साधकांना सूर्याचा रथ ओढण्याची पूर्वी संधी मिळाली असेल; म्हणून आता त्यांना सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त त्यांचा रथ ओढण्याची संधी मिळाली आहे.’
आ. सोहळ्याच्या ठिकाणी वार्याची झुळुक आल्यावर ‘देवता, ऋषिमुनी आणि संत-महंत उपस्थित आहेत अन् ते गुरुदेवांवर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे मला जाणवत होते.
इ. सोहळा पहातांना मला पटांगणात हिरवा आणि नंतर लाल-केशरी हे रंग दिसत होते. देवाने मला या रंगांचा अर्थ सुचवला, ‘हिंदु राष्ट्र गुरुदेवांच्या प्रचंड त्यागातून आणि साधकांच्या प्रयत्नांतून स्थापन होणार आहे. हिंदु राष्ट्र ‘सुख-समृद्धी, आनंद आणि उत्साह’ यांनी ओतप्रत भरलेले असेल. त्या वेळी सर्वत्र आनंदी आनंदच असेल.’
ई. मला गुरुदेवांचा चेहरा सोनेरी दिसत होता. त्यांच्या चेहर्यातून सोनेरी चैतन्य सर्वत्र प्रक्षेपित होत होते. त्यामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते. मला सर्वत्र चैतन्य आणि चैतन्यच दिसत होते.
उ. मी रथात बसलेल्या गुरुदेवांना हात जोडलेल्या स्थितीत पाहिले. ‘त्यांच्या जोडलेल्या हातांकडे एकटक पहातच रहावे’, असे मला वाटत होते. ‘ते हात शेवटपर्यंत थकले नाहीत’, याची मला जाणीव होत होती. मला त्यांच्या चेहर्यावर उत्साह, तेज, चैतन्य आणि साधकांप्रती वाटणारी प्रीती अन् अतीव आदर जाणवत होता.
ऊ. ‘गुरुदेवांनी आम्हा सर्व साधकांना आहे त्या स्थितीत स्वीकारले आहे. त्यामुळे सर्व साधक गुरुदेवांच्या कोमल चरणांना चिकटून बसले आहेत’, असे मला जाणवत होते.
‘गुरुदेवा, हे सर्व आपणच मला सुचवले आणि माझ्याकडून लिहून घेतले. ते मी आपल्या चरणी समर्पितभावाने अर्पण करत आहे.’
– श्रीमती नलिनी सूर्यवंशी(वय ६९ वर्षे), कराड, जिल्हा सातारा. (१६.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |