‘ब्रह्मोत्सवाला जाण्यासाठी करावयाचा एकत्रित बसप्रवास आध्यात्मिक स्तरावर व्हावा’, यासाठी केलेले नियोजन आणि त्या सेवांतून साधकांना मिळालेला आनंद !

मुंबई, ठाणे आणि रायगड येथील साधकांनी अनुभवलेला ‘न भूतो न भविष्यति ।’, असा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा ! (भाग ३)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘पुढे येणार्‍या आपत्काळात प्रवासासाठी सर्वांची सोय कशी करावी ?’, हे या लेखातून कळेल; म्हणून सर्वांनी या लेखाचा अभ्यास करावा आणि त्याविषयी अभ्यासवर्ग घ्यावेत.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. बसप्रवासाचे केलेले नियोजन

कु. वैभवी भोवर

‘साधकांना पुढीलप्रमाणे सेवा देण्यात आल्या होत्या.

अ. ‘साधकांनी बसमध्ये कोणत्या ठिकाणाहून बसावे ? बसमधून जाणारे सर्व साधक घरून वेळेत निघाले का ? ते कधी पोचणार ? कसे येणार ? त्यात काही अडचण नाही ना ? हे पहाणे’, इत्यादी.

आ. ‘प्रवासासाठी आवश्यक असणारे साहित्य, उदा. मेगाफोन, साधकांना बसमध्ये चढण्यासाठी स्टूल इत्यादी उपलब्ध करून देणे’ इत्यादी.

इ. ‘प्रवासाच्या दिवशी ‘प्रत्येक वाहनाची शुद्धी झाली आहे ना ?’, हे पहाणे, गाडीत आध्यात्मिक स्तरावरील उपाय होण्यासाठी रिकामे खोके लावणे, बसमध्ये देवतेचे चित्र लावणे, साधकांना नामजपादी उपाय करण्याची आठवण करून देणे; कुणाला आध्यात्मिक त्रास झाला, तर नामजपादी उपाय विचारून घेणे’ इत्यादी.

ई. ‘साधकांची सोय योग्य रितीने होत आहे ना ?’, याकडे पहाणे, त्यात येणार्‍या अडचणींवर उपाययोजना काढणे, ‘साधक बसच्या वेळेत पोचत आहेत ना ?’, हे बघणे, ‘भोजनासाठी किंवा आवरण्यासाठी साधक थांबतील, तेव्हा निघतांना पुन्हा सर्व जण बसमध्ये बसले आहेत ना ?’, याची निश्चिती करूनच बस सोडणे’ इत्यादी.

सौ. ऋचा सुळे

उ. ‘ज्या साधकांना जेवणाचा डबा आणण्यास अडचण आहे, त्यांच्यासाठी डबा कोण आणू शकेल ?’, याचे नियोजन आधीच केले होते. पहिल्या दिवशी सर्वांनी प्रवासात स्वतःचा डबा आणला होता. दुसर्‍या दिवशी साधकांना सकाळचा अल्पाहार आणि दुपारचा महाप्रसाद देण्याचे नियोजन कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथून केले होते.

ऊ. मुंबई, ठाणे आणि रायगड येथून गोवा येथे जाण्यासाठी अनेक घंटे लागतात. त्यामुळे सर्व साधक ब्रह्मोत्सवाच्या आदल्या दिवशी ते रहात असलेल्या ठिकाणाहून निघाले होते. ‘किती साधकांच्या निवासाचे नियोजन करावे लागणार ? वैयक्तिक वाहनाने आणि आगगाडीने जाणारे साधक कधी पोचणार ? त्यांच्या निवासाचे नियोजन कुठे करू शकतो ?’, याचे नियोजन बघणे, त्यात त्यांना काही अडचणी असल्यास त्या सोडवणे’ इत्यादी.

ए. जिल्ह्यात असलेल्या प्रथमोपचारकांच्या संख्येनुसार प्रत्येक बससाठी एक प्रथमोपचारक साधक ठरवला होता. प्रत्येक बससाठी एक प्रथमोपचार पेटी सिद्ध केली होती. प्रवासाच्या मार्गात काही आपत्कालीन अडचण (इमर्जन्सी) किंवा वैद्यकीय अडचण आल्यास ‘कोणत्या जिल्ह्यात कोणते ओळखीचे वैद्य आहेत ? रुग्णवाहिका आणि कोणती रुग्णालये जवळ आहेत ?’, याची माहिती घेऊन ठेवली होती.

२. साधकांमध्ये सेवा विभागून दिल्यामुळे साधकांमध्ये संघटितपणा निर्माण होणे आणि त्यांना गुरुसेवेतून आनंद मिळणे

सौ. मानसी जोशी

 

अशा प्रकारे सेवांचे नियोजन केल्यामुळे साधकांमधील ‘पुढाकार घेऊन सेवा करणे, सेवांच्या नियोजनात आणि प्रत्यक्ष कृतीत सहभागी होणे’, हा भाग वाढला. ‘भगवंताने आपल्याकडे बसमधील एवढ्या साधकांचे दायित्व दिले आहे’, या विचारामुळे साधकांकडून केवळ स्वतःपुरता विचार न होता समष्टीचा विचार होत होता. साधकांमध्ये सेवा विभागून दिल्यामुळे अनेक साधकांना या नवीन सेवांमधून विविध गोष्टी आणि बारकावे शिकायला मिळाले. साधकांना संघटितपणा आणि गुरुसेवा यांतून आनंद मिळाला.

३. साधकांचे नातेवाईक आणि जिज्ञासू यांनी ‘प्रथमच अनुभवत असलेला हा दैवी प्रवास संपूच नये’, असे वाटत असल्याचे सांगणे

प्रवासात साधकांसह त्यांचे काही नातेवाईक आणि जिज्ञासूही होते. असा दैवी प्रवास साधक आणि त्यांचे नातेवाईक प्रथमच करत होते. साधक पुढाकार घेऊन करत असलेल्या वेगवेगळ्या सेवा पाहून त्यांचे नातेवाईक आणि जिज्ञासू यांनी सांगितले, ‘‘आम्ही आतापर्यंत अनेक वेळा प्रवास केला; परंतु असा दैवी प्रवास आम्ही प्रथमच अनुभवला. आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन शिकायला मिळाले. या सर्व नियोजनात परिपूर्णता आणि शिस्त होती. त्यामुळे आम्हाला वेगळाच आनंद मिळाला. ‘हा प्रवास संपूच नये’, असे आम्हाला वाटत होते. आम्हाला प्रवासात कुठलाच त्रास झाला नाही किंवा कंटाळा आला नाही.’’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– कु. वैभवी सुनील भोवर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय २६ वर्षे), सौ. ऋचा किरण सुळे आणि सौ. मानसी जोशी, मुंबई. (११.६.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक