रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. सणा-समारंभांत घरोघरी रांगोळी काढली जाते. एवढेच नव्हे, तर शेणाने सारवलेल्या भूमीवर रांगोळी न काढल्यास ते अशुभ मानले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत. जेथे सात्त्विक रांगोळी काढली जाते, तेथे आपोआपच मंगलदायी वातावरणाची निर्मिती होते. हिंदु धर्मातील सर्व सण, तसेच विधी कोणत्यातरी देवतेशी संबंधित असतात. त्या त्या सणाच्या दिवशी किंवा विधीच्या वेळी त्या त्या देवतेचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात असते किंवा विधीमुळे तेथे आकृष्ट होते. देवतेच्या तत्त्वाचा सर्वांना लाभ होण्यासाठी सात्त्विक रांगोळ्या काढणे आवश्यक असते. चला, तर मग सात्त्विक रांगोळ्या कशा काढाव्यात हे जाणून घेऊया !
देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे, तसेच नावे असलेल्या रांगोळ्या काढतांना त्यांचा अनादर होणार नाही, याची दक्षता घ्या !
कोणत्याही घटकाशी संबंधित शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, हा अध्यात्मशास्त्रातील सिद्धांत आहे. तो देवता, राष्ट्रपुरुष, त्यांची नावे, शुभचिन्हे असलेल्या रांगोळ्यांनाही लागू आहे. त्यामुळे अशा रांगोळ्या काढतांना आणि काढल्यानंतर त्यांचा अनादर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. या रांगोळ्या रस्त्यावर काढणे टाळावे, तसेच त्या पायदळी येणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी. सण, उत्सव किंवा कार्यक्रम झाल्यानंतर अशा रांगोळ्या केरसुणीने नव्हे, तर कापडाने गोळा करून विसर्जित कराव्यात.
कलाकृती (रांगोळी) सात्त्विक काढा !
रांगोळीची कलाकृती काढतांना ‘ती डोळ्यांना कशी दिसते ?’ आणि ‘तिच्यात सात्त्विक स्पंदने आहेत ना ?’, हे दोन्हीही पहाणे महत्त्वाचे असते. कलाकृतीतून प्रक्षेपित होणारी चांगली किंवा त्रासदायक स्पंदने ही कलाकृतीचा आकार (Shape), कलाकृतीतील आकृत्यांची दिशा, कलाकृतीतील आकारांची गतीदर्शकता, रचना, समतोल (Balance) आणि नैसर्गिकता यांवर अवलंबून असतात. रांगोळी जेवढी सात्त्विक, तेवढी तिच्यात सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक असते. सात्त्विक रांगोळीतील सकारात्मक स्पंदनांचा लाभ रांगोळी काढणारे आणि पहाणारे या दोघांनाही होतो.
१. आकार (Shape) : प्रत्येक आकाराची स्पंदने निराळी असतात. रांगोळीच्या कलाकृतीतील अधिकाधिक आकार सात्त्विक असतील, तर त्या संपूर्ण कलाकृतीची एकूण स्पंदने सात्त्विक होतात.
२. दिशा : कलाकृतीतील आकारांची दिशा पालटल्यास पूर्ण कलाकृतीची स्पंदने पालटतात.
३. गतीदर्शकता : गतीदर्शक कलाकृती स्थिर ठिकाणी, उदा. भूमीवर काढल्यास तिची गतीदर्शकता लक्षात येते. त्यामुळे वास्तवात गतीदर्शक असलेले आकार (उदा. चक्र) रांगोळीत काढतांना त्यांच्या मूळ गतीदर्शक स्वरूपात काढू शकतो; मात्र स्थिरतेचे प्रतीक असलेले स्वस्तिक, ॐ (निर्गुण) हे आकार गती दर्शवणार्या स्वरूपात काढू नयेत. त्याऐवजी ते स्थिर वाटतील, असेच काढावेत; कारण त्यांत गतीपेक्षा स्थिरता महत्त्वाची आहे. अशी शुभचिन्हे त्यांच्या मूळ स्वरूपातच काढावीत.
४. रचना : कलाकृतीत अनेक आकार असतात. आकारांच्या रचनेवर रांगोळीची स्पंदने अवलंबून असतात. कलाकृतीतील सर्व आकार सात्त्विक असूनही त्यांची रचना योग्य नसेल, तर एकूण कलाकृतीची स्पंदने त्रासदायक होऊ शकतात.
५. समतोल (Balance) : रांगोळीतील विविध आकारांचे साहाय्य घेऊन जागेची विभागणी योग्य प्रकारे केल्यास रांगोळीतील त्रासदायक स्पंदने नष्ट होऊन चांगली स्पंदने निर्माण होतात. अधिकाधिक योग्य आकार आणि जागेची योग्य विभागणी होत गेल्यास रांगोळीत देवतांचे तत्त्व येण्यास साहाय्य होते.
६. नैसर्गिकता : आकार जेवढा नैसर्गिक असतो, तेवढे त्या आकाराशी संबंधित देवतेचे तत्त्व रांगोळीत आकर्षित होण्यास साहाय्य होते.
ॐ
(रांगोळ्या आणि लेख यांचा संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सात्त्विक रांगोळ्या’)