‘फोक्सवॅगन’ने प्रभु श्रीरामाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले !

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या संघटित विरोधाचा परिणाम !

(ही छायाचित्रे  देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

मुंबई – वाहन निर्मिती करणारे जर्मनीतील आस्थापन ‘फोक्सवॅगन’ने तिच्या विज्ञापनातून प्रभु श्रीरामाचा अवमान केला होता. याचा हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी विरोध केल्यावर हे विज्ञापन हटवण्यात आले आहे.

दसर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर हे विज्ञापन प्रसारित करण्यात आले होते. यात प्रभु श्रीरामाला फोक्सवॅगन गाडी चालवतांना दाखवण्यात आले होते. त्याच वेळी वाहनाच्या मार्गामध्ये रावण दिसतो. त्याला पाहून श्रीराम रावणाला वाहनात बसवतो. त्यानंतर रावण वाहनात बसतो. यातून ‘स्वतःमधील चांगुलपणाद्वारे वाईटाला दूर करू शकतो’ असा संदेश देण्यात आला होता. आर्थिक लाभासाठी प्रभु श्रीरामाचे मानवीकरण करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून हिंदु जनजागृती समितीने ट्वीट करून विरोध केला होता. यानंतर धर्माभिमान्यांनीही या विज्ञापनाला विरोध करण्यास प्रारंभ केला. यानंतर फोक्सवॅगनने त्याच्या सामाजिक माध्यमांवरील सर्व खात्यांवरून हे विज्ञापन हटवले.