आधी ठाण्यातील कळवा, त्यानंतर नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि पाठोपाठ नागपूर येथील सरकारी रुग्णालयांत झालेल्या मृत्यूंमुळे ‘सरकारी रुग्णालयात जावे कि नाही ?’, असा प्रश्न आता रुग्णांना पडू लागला आहे. या मृत्यू प्रकरणांमुळे सरकारी रुग्णालये आधीच अपकीर्त झाली असतांना या अपकीर्तीत आणखीन भर टाकणारा प्रकार मुंबईत घडला. मुंबईतील सरकारी रुग्णालयात एका १५ वर्षीय रुग्ण मुलीवर रुग्णालयातील सफाई कर्मचार्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार ८ ऑक्टोबरला उघडकीस आला. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून सफाई कर्मचारी रोहिदास दयालाल सोळंकी याला पोलिसांनी अटक केली आहे.
१. यापूर्वीच्या घटना
याआधीही मुंबईतील सरकारी रुग्णालयात महिलांशी असभ्य वर्तन केल्याच्या घटना घडल्या आहेत. आईसमवेत सोनोग्राफीसाठी आलेल्या एका ९ वर्षांच्या मुलीला प्रसाधनगृहात नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केल्याची घटना याच वर्षी एप्रिल मासात घडली होती. या वेळी जे.जे. मार्ग पोलिसांनी विनयभंगासह ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला होता. याच रुग्णालयाच्या परिसरात निवासी डॉक्टरांसाठी वसतीगृह आहे. वर्ष २०२० मध्ये एक महिला निवासी डॉक्टर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास काम आटपून वसतीगृहाकडे जात असतांना एका कक्षसेवकाने दारूच्या नशेत पाठीमागून त्यांना मिठी मारली होती. महिला डॉक्टरने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. एका मागोमाग एक घडलेल्या या घटना पहाता ‘सरकारी रुग्णालय महिलांसाठी असुरक्षित आहे का ?’, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
२. के.ई.एम्.मधील अरुणा शानभाग यांचे प्रकरण
२७ नोव्हेंबर १९७३ ला मुंबईतील परळ येथील के.ई.एम्. या सरकारी रुग्णालयात अरुणा शानभाग या परिचारिकेवर सोहनलाल वाल्मीकि नावाच्या ‘वॉर्डबॉय’ने अमानुष अत्याचार केला होता. या धक्क्याने त्या ‘व्हेजिटेटिव्ह स्थिती’मध्ये (कोमामध्ये) गेल्या. पुढे ४२ वर्षे त्या याच स्थितीमध्ये होत्या. त्यांच्या वेदना आणि किंकाळ्या रुग्णालयात आलेल्या अनेकांनी पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. त्यांना इच्छामरण देण्यास सर्वोच्च न्यायालयानेही नकार दिल्याने या वेदना सहन करतच त्यांनी आयुष्य काढले. ही ४२ वर्षे रुग्णालयातील समस्त परिचारिकांनी त्यांची पोटच्या मुलीप्रमाणे सेवा केली. वर्ष २०१५ मध्ये अरुणा शानभाग यांनी अखेरचा श्वास घेतला; मात्र त्यांना ४२ वर्षे मरणप्राय वेदना देणारा नराधम ‘वॉर्डबॉय’ अजूनही जिवंत आहे. यानंतरच्या कालावधीतही सरकारी रुग्णालयांच्या परिसरांत स्त्रियांशी असभ्य वर्तन केल्याच्या अनेक घटना वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या आहेत.
३. रुग्णालयातील कर्मचार्यांचे गैरवर्तन !
सरकारी रुग्णालये हा सरकारचा सेवाभावी उपक्रम आहे. वैद्यकीय क्षेत्रातील महागडे उपचार सर्वांनाच परवडणारे नसल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात. उपचारांसाठी रुग्णालयात भरती होतात. या काळात येथील काही ‘वॉर्डबॉय’, सफाई कर्मचारी यांच्या असभ्य वर्तणुकीचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना दमदाटी करणे, रुग्णाला सेवा पुरवण्याच्या मोबदल्यात नातेवाइकांकडून पैसे मागणे, निवासी डॉक्टर आणि कर्मचारी यांसमवेत वाद घालणे, रुग्णालयाच्या परिसरात शिवीगाळ करणे, कामावर असतांना मद्यपान, धूम्रपान करणे यांसारखे प्रकार बहुतांश सरकारी रुग्णालयांत थोड्या फार प्रमाणांत पहायला मिळतात. सेवाभावी वृत्तीने रुग्णांची मनोभावे सेवा करणारे अनेक कर्मचारीही रुग्णालयांत असतात; मात्र काही उद्दाम कर्मचार्यांमुळे सर्वांचेच नाव अपकीर्त होत आहे. हे उद्दाम कर्मचारी कोणत्या ना कोणत्या कामगार संघटनेशी जोडलेले असल्याने त्यांना अधिक बळ मिळत असते.
४. प्रशासन काही करणार का ?
नागरिकांच्या सेवेसाठी सरकार प्रतिवर्षी अनेक आरोग्य योजना आणि उपक्रम राबवत असते; मात्र रुग्णालयातील कर्मचार्यांना शिस्त लावण्यासाठी आणि त्यांचे आचरण सुधारण्यासाठी प्रशासन काही करतांना दिसत नाही. ज्या दिवशी या कर्मचार्यांना शिस्त लागेल, त्या दिवशी सरकारी रुग्णालये आणि शासकीय योजना यांवरील नागरिकांचा विश्वासही वाढेल.
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई. (११.१०.२०२३)
संपादकीय भूमिकारुग्णालयातील कर्मचार्यांना वागण्याविषयी प्रशिक्षण नसणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! |