वर्षभर पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी लढा देण्याचा निर्धार !

‘जागर पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा’ या मोहिमेचा प्रारंभ !

‘जागर पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा’ या मोहिमेच्या प्रारंभी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – काही तथाकथित पर्यावरणवादी, तसेच अन्य काही संघटना केवळ गणेशोत्सवातच जाग्या होऊन ‘श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते’, अशी आवई उठवतात. प्रत्यक्षात वर्षभर पंचगंगा नदीत जे सांडपाणी, नाले, साखर कारखान्यांचे पाणी मिसळते, या संदर्भात कोणतीच कृती करत नाहीत. प्रशासनही या संदर्भात गणेशभक्तांचे धार्मिक अधिकार डावलते. त्यामुळे या सर्व घटकांना उत्तर देण्यासाठी नवरात्रीच्या काळात सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येत २० ऑक्टोबरला पंचगंगा नदीच्या काठावर ‘जागर पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा’ या मोहिमेचा प्रारंभ केला. या प्रसंगी प्रतिज्ञा करून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी वर्षभर सातत्याने आणि संघटितपणे लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.

‘जागर पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा’ या मोहिमेच्या प्रसंगी प्रतिज्ञा घेतांना विविध हिंदुत्वनिष्ठ
‘जागर पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा’ या मोहिमेच्या प्रसंगी पंचगंगा नदीला दीप अर्पण करतांना श्री. आनंदराव पवळ, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ

या लढ्यात निवेदन देणे, आंदोलन करणे, जागृती मोहीम, जनसंपर्क, लोकप्रतिनिधींच्या भेटी घेणे, नागरिकांचे प्रबोधन करणे, प्रदूषण मंडळाची दुटप्पी भूमिका जनतेसमोर मांडणे यांसह अन्य गोष्टींचा समावेश आहे. या प्रसंगी पंचगंगेची आरती करून पंचगंगादेवीचे आशीर्वाद घेण्यात आले. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि श्री. शिवानंद स्वामी, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदु युवा प्रतिष्ठानचे श्री. अशोक देसाई,  भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शरद माळी, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अमर जाधव, अमेय भालकर, आबा जाधव, स्वप्नील मुळे, बंडू जाधव, बाळासाहेब नलावडे यांसह भाविक उपस्थित होते.

‘जागर पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा’ या मोहिमेच्या प्रसंगी पंचगंगा नदीवर आरती करतांना विविध हिंदुत्वनिष्ठ