हिंदुत्वनिष्ठांसमवेत गैरवर्तन करणार्‍या दोंडाईचा (धुळे) पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना दंडित करा !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पत्रकार परिषदेद्वारे मागणी !

प्रतिकात्मक चित्र

धुळे – सनातन हिंदु धर्माच्या विरोधात द्वेषमूलक (हेट स्पीच) वक्तव्ये करणारे तमिळनाडू येथील उदयनिधी स्टॅलीन, कर्नाटक येथील प्रियांक खर्गे, तसेच महाराष्ट्रातील आमदार जितेंद्र आव्हाड, पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यास धर्मप्रेमी नागरिक गेले होते. तक्रार प्रविष्ट करून घेण्याऐवजी त्यांना तासभर ताटकळत ठेवणे, शिवीगाळ करणे आणि धमकी देणे असे गैरवर्तन दोंडाईचा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास ताटीकोंडलवार यांनी केले. पोलिसांनी सामान्य नागरिकांना आधार द्यायला हवा, येथे तर दाद मागायला आलेल्या सामान्य नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार त्यांनी केलेला आहे. ‘हे अत्यंत चुकीचे असून त्यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्यांना दंडित करण्यात यावे’, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी धुळे पोलीस अधीक्षकांकडे केली आहे, अशी माहिती हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता अमित दुसाने यांनी दिली. ते धुळे येथील दैनिक ‘आपला महाराष्ट्र’च्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेला दोंडाईचा येथील अर्जदार श्री. प्रफुल्ल रामोळे, हिंदु जनजागृती समितीचे जळगाव, धुळे-नंदुरबार समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले.

  • विनाकारण शिवीगाळ आणि धमकी दिली !
  • तक्रार स्वीकारण्यात दाखवली अनास्था

१. दोंडाईचा येथील काही धर्मप्रेमी तक्रार देण्यासाठी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनी तक्रार अर्ज स्वीकारण्याची विनंती विलास ताटीकोंडलवार यांच्याकडे केली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या हुकुमाचा अवमान होईल, अशा पद्धतीने सर्व प्रकरणात अनास्था दाखवली. त्यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी श्रीराम पवार येईपर्यंत थांबण्यास सांगितले.

२. १ घंटा वाट पाहिल्यावर धर्मप्रेमींनी पवार यांचा भ्रमणभाष मिळवून त्यावर संपर्क केला. तेव्हा ते सुटीवर गेले असून त्यांचा कार्यभार विलास ताटीकोंडलवर यांच्याकडे असल्याचे समजले. धर्मप्रेमींनी त्यांना पुन्हा तक्रार स्वीकारण्याची विनंती केली.

३. एका धर्मप्रेमीने झालेल्या प्रकाराविषयी त्यांना विचारल्यावर ते संतप्त झाले आणि त्यांनी एकदम खालच्या पातळीवर येऊन शिवीगाळ चालू केली. धर्मप्रेमी त्यांना नम्रपणे सर्व सांगत होते. तरीही ते समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांच्या अंगावर धावून आले, तसेच ‘पुढे बघून घेईन’, अशा आशयाची धमकीसुद्धा त्यांना दिली.

४. ताटीकोंडलवर यांनी केलेली शिवीगाळ आणि अरेरावीने दिलेली धमकीची भाषा ध्वनीमुद्रित करण्यात आली आहे. ‘हे ध्वनीमुद्रण वरिष्ठ अधिकार्‍यांना माहितीसाठी पुढे पाठवले आहे’, असे अर्जदार श्री. प्रफुल्ल रामोळे यांनी सांगितले.

५. समितीचे श्री. प्रशांत जुवेकर म्हणाले की, पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचारी हा जनतेच्या सेवेसाठी, तसेच सार्वजनिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी नेमला जातो. लोकशाही प्रणालीमध्ये सनदशीर मार्गाने विरोध करणे, हा नागरिकांचा हक्क आहे. राज्यघटनेनुसार धर्मप्रसार करणे हे केवळ धर्माचा प्रसार करणे येथपर्यंतच संकुचित नसून धर्माच्या विरोधात जर एखादी व्यक्ती द्वेषमूलक वक्तव्ये करत असेल, तर त्याविरुद्ध गुन्हे नोंदवावेत, या मागणीचा अधिकारही त्यात अंतभूर्त आहे. या प्रकरणी तक्रार मा. गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. गृहसचिव आणि मा. अवर सचिव गृह विभाग, मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य तसेच मा. पोलीस महानिरीक्षक, नाशिक विभाग यांच्याकडे कारवाईस्तव पाठवण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका :

  • हिंदुत्वनिष्ठांवर अरेरावी आणि शिवीगाळ करणार्‍या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !
  • हिंदुत्वनिष्ठांच्या अंगावर धावून जाणारे पोलीस कायद्याचे रक्षक कि भक्षक ?
  • जनतेशी गैरवर्तन करून शिवीगाळ करणारे, धमकावणारे पोलीस अधिकारी पोलीस खात्याला कलंकच आहेत !