The Wire : ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाची जप्त केलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे परत करण्याचा आदेश !

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाचे मत

नवी देहली – देहलीच्या तीसहजारी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पवनसिंह राजावत यांनी देहली पोलिसांना ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाच्या संपादकांचे भ्रमणभाष, भ्रमणसंगणक (लॅपटॉप) आदी जप्त केलेली उपकरणे परत करण्याचा आदेश दिला. या वेळी न्यायमूर्ती राजावत यांनी, ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे रक्षण करणे आवश्यक आहे. वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते. पत्रकारांना मोकळेपणाने काम करू दिले नाही, तर लोकशाहीच्या मुळावर तो खोल आघात असेल’, असे लेखी निरीक्षण नोंदवले.

देहली पोलिसांनी गेल्या वर्षी भाजपचे नेते अमित मालवीय यांच्या तक्रारीवरून ‘वायर’च्या संपादकांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली होती. न्यायमूर्ती राजावत यांनी  आदेशात म्हटले की, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केल्यामुळे संपादकांना काम करतांना अडचणी येत आहेत. देहली पोलिसांनी केलेली ही कारवाई घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.

संपादकीय भूमिका

  • न्यायालयाने अभिव्यक्तीस्वातंत्र्याविषयी मांडलेले मत योग्यच आहे; मात्र न्यायालयाने ‘द वायर’सारख्या राष्ट्रघातकी प्रसारमाध्यमांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली केलेल्या देशविरोधी कारवायांकडे लक्ष घालून सामान्य नागरिकांना आश्‍वस्त करावे, अशीच राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे !
  • या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारनेही या प्रकरणात सखोल चौकशी होऊन सत्य समोर येण्यासाठी वरिष्ठ न्यायालयात दाद मागावी, अशीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !