Namo Bharat : देशातील पहिली जलदगती रेल्वे ‘नमो भारत’चे पंतप्रधानांकडून उद्घाटन !

नावात ‘नमो’ असल्याने काँग्रेसकडून टीका !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील साहिबाबाद येथून देशातील पहिल्या जलदगती रेल्वे ‘नमो भारत’चे उद्घाटन केले. ‘आर्.आर्.टी.एस्.  कनेक्ट’ नावाच्या अ‍ॅपवर या रेल्वेची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.

१. रेल्वेगाडीच्या नावात ‘नमो’ (नरेंद्र मोदी यांना ‘नमो’ नावाने संबोधले जाते) असल्याने काँग्रेसने यावर टीका केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, ‘नमो स्टेडियमनंतर आता नमो ट्रेन ! आत्मग्नतेला कोणतीही सीमा नाही !’  काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी ‘एक्स’वरून लिहिले, ‘‘केवळ भारतच का लिहिले ? देशाचे नाव पालटून नमो करा !’’ याआधी कर्णावती येथील क्रिकेट मैदानाचे नावही ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ करण्यात आले आहे.

२. ही रेल्वेगाडी १६० किमी प्रतीघंटा या वेगाने धावणारी असून पहिल्या टप्प्यात उत्तरप्रदेश राज्यातील साहिबााबाद ते दुहाईपर्यंत १७ किमीच्या परिसरात धावत आहे. या ‘कॉरिडोर’ची (सुसज्ज मार्गाची) एकूण लांबी ८२ किमी आहे. त्यांपैकी १४ किमी देहलीत आहे, तर ६८ किमी उत्तरप्रदेशात आहे. नमो भारत दिल्ली मेट्रोच्या विविध मार्गांशी जोडली जाईल. अलवर, पानिपत आणि मेरठ यांसारख्या शहरांना देहलीशी जोडेल. या रेल्वे गाडीला ‘बुलेट ट्रेन’चा पहिला टप्पा म्हणूनही पाहिले जात आहे.