राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांच्यासह कुटुंबियांना १३७ कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस !

अवैध गौण खनिज उत्खनन केल्याचे प्रकरण

जळगाव – अवैध गौण खनिज उत्खनन केल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय यांना १३७ कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांच्या सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनाही ही नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिसीला एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांनी दुजोरा दिलेला नाही.

मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली होती. विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथकाची (‘एस्.आय.टी.’ची) नियुक्ती केली. पाटील यांनी विधान परिषदेतही उत्खननाचे सूत्र उपस्थित केले. ‘१ लाख १८ सहस्र ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन झाले आहे. खडसे यांच्यावरील आरोप खरे असल्यानेच त्यांची चौकशी झाली आहे. या घोटाळ्यात खडसे यांच्यावर कारवाई होईल’, असा दावा त्यांनी केला.