‘खरे ज्ञान कोणते आणि फसवे ज्ञान कोणते ?’, हे सांगू शकणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘ईश्वरी ज्ञान मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये बर्‍याच गोष्टींचा हस्तक्षेप होतो. वाईट शक्ती मूळ ज्ञानात चुकीची माहिती घालू शकतात. त्यामुळे ज्ञानाच्या माध्यमातून मिळालेली सर्व माहिती १०० टक्के योग्य  असेलच, असे नाही. ‘ज्या साधकाच्या माध्यमातून ज्ञान मिळत आहे, त्याची साधना, देवावरील दृढ श्रद्धा आणि भाव’, या सर्वांमुळे सूक्ष्मातून मिळणार्‍या ईश्वरी ज्ञानाचे मोठ्या वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यास साहाय्य होऊ शकते. वाईट शक्ती ज्ञानाच्या माध्यमातून फसवू शकतात. ‘खरे ज्ञान कोणते आणि फसवे ज्ञान कोणते ?’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे सर्वज्ञ संतच सांगू शकतात.

एकदा सूक्ष्मातून भविष्यकाळाचे ज्ञान मिळणार्‍या समाजातील एका व्यक्तीने सांगितले, ‘‘तुम्ही अमुक दक्षिणा दिली, तर तुमच्यापैकी एका साधकाचा मृत्यूयोग टळेल.’’ पैशांची मागणी करून समाजाला फसवणारे असे भविष्यकार आपल्याला नकोत. बर्‍याच वेळा अशा व्यक्ती समाजातील सर्वसामान्य माणसाला मृत्यूची भीती दाखवून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. परात्पर गुरु डॉक्टरांनी आपल्याला समाजातील अशा माणसांचा अभ्यास करायला शिकवले असल्याने, तसेच आपल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा असल्याने आपण अशा फसव्या व्यक्तींपासून सावध राहू शकतो; परंतु सर्वसामान्याचे काय ?

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

ज्या साधकांनी देवासाठी तन-मन-धनाचा सर्वस्वी त्याग केला आहे आणि जे गुरूंच्या छत्रछायेत साधना करत आहेत, त्यांनी आणखी वेगळी कोणती दक्षिणा द्यायला हवी ? सर्वज्ञता असलेल्या देवाला हे सर्व कळते. ज्ञान हे ज्ञानच असते. त्यात पैशांची मागणी केलेली आढळत नाही; कारण सर्वशक्तीमान ईश्वराला पैशांची काय आवश्यकता आहे ? तो काय मनुष्य आहे ?

समाजातील बर्‍याच लोकांनी भविष्याच्या नावावर धंदा चालू केल्याचे आढळते. अशा काही लोकांच्या माध्यमातून वाईट शक्ती मनुष्याला भावनिक स्तरावर अडकवून फसवू शकतात.

अध्यात्मातील एका अधिकारी संतांनी त्यांना देवतांकडून मिळालेल्या संदेशाद्वारे सांगितले, ‘अमुक एक साधिका वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे बेशुद्धावस्थेत जाऊ शकते. जर ही साधिका यातून जगली, तर तिच्या हातून पुढे ज्ञान ग्रहण करण्याचे पुष्कळ मोठे कार्य होणार आहे. हा कुयोग टाळण्यासाठी देवतांना सुवर्णदान करावे लागेल. हे सुवर्णदान समुद्रामध्ये अर्पण करावे लागेल.’ ‘देवाकडून आलेल्या या ज्ञानामध्ये सत्यता होती’, हे परात्पर गुरु डॉक्टरांनी ओळखले.

पहिल्या उदाहरणात पैसे भविष्य सांगणार्‍या व्यक्तीलाच मिळणार होते आणि दुसर्‍या प्रसंगात संतांच्या सांगण्यानुसार सुवर्ण द्यावयाचे होते; परंतु ते समुद्रात अर्पण करावयाचे होते. त्याचा त्या संतांना वैयक्तिक लाभ होणार नव्हता. ‘सुवर्णदानाच्या माध्यमातून देवतांच्या कृपेने मिळणार्‍या तेजतत्त्वाच्या बळावर त्या साधिकेला जीवदान मिळाले’, ही दैवी प्रक्रिया होती. ही प्रक्रिया ओळखण्यासाठी तीव्र साधना आणि साधनेतील योग्य ‘समष्टी दृष्टीकोन’ असायला हवा अन् सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे हे ओळखण्यासाठी आवश्यक असणारा आध्यात्मिक अधिकारही हवा. असे जाणणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे एकमेवाद्वतीय आहेत. त्यांच्यामुळे आज आपल्याला अध्यात्माचे हे अमूल्य ज्ञान मिळत आहे.’

– सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ (१.५.२०२०)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.