महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची कु. अपाला औंधकर (वय १६ वर्षे) हिला नवरात्रीच्या वेळी आलेल्या अनुभूती !

२६.९.२०२२ ते ५.१०.२०२२ या कालावधीत असलेल्या नवरात्रीनिमित्त रामनाथी आश्रमात यज्ञ झाले. या यज्ञाच्या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीताशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांना गायन आणि वादन या सेवा करण्याची संधी मिळाली. गायनसेवा करतांना कु. अपाला औंधकर हिला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत. 

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
कु. अपाला औंधकर

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे वाक्य ‘ब्रह्मवाक्य’ असल्याची आलेली अनुभूती

१ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी ‘यज्ञाच्या वेळी तू आरती म्हणू शकतेस’, असे सांगणे : ‘मी ६ वर्षांची असल्यापासून शास्त्रीय गायन शिकत होते. वर्ष २०२० मध्ये मी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना भेटले होते. त्या साक्षात् देवीस्वरूप असल्याने मला ‘त्यांच्यासमोर अन्नपूर्णास्तोत्र गावे’, असे वाटले आणि मी ते त्यांना गाऊन दाखवले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘हे स्तोत्र ऐकतांना माझ्यातील देवीतत्त्व जागृत झाले’, असे मला जाणवले. किती भावपूर्ण गातेस ! रामनाथी आश्रमात यज्ञ असतात, तेव्हा तू आरती म्हणू शकतेस.’’

१ आ. ‘देवाची इच्छा असेल, तेव्हा तो यज्ञाच्या वेळी आरती म्हणायची संधी देईल’, असे वाटणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ असे म्हणाल्यावर, ‘यात माझे काहीच नसून ही गुरुदेवांचीच वाणी आहे’, याची मला जाणीव झाली. त्यामुळे ‘मला ती संधी कधी मिळेल ?’, याचा मी अधिक विचार केला नाही. ‘देवाची इच्छा असेल, तेव्हा तो नक्कीच ती सेवा माझ्याकडून करून घेईल’, असे मला वाटले.

१ इ. नवरात्रीत यज्ञाच्या वेळी गायन आणि आरती या सेवा सादर करता आल्यावर ‘सनातनच्या तिन्ही गुरूंचे प्रत्येक वाक्य हे ‘ब्रह्मवाक्य’ आहे’, याची जाणीव होणे : वर्ष २०२२ मधील नवरात्रोत्सवात महर्षींच्या आज्ञेनुसार महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील संगीताशी संबंधित सेवा करणार्‍या काही साधकांनी यज्ञानंतर साक्षात् आदिशक्तिस्वरूप मातेच्या समोर गायन आणि आरती या सेवा सादर केल्या. तेव्हा मलाही सेवेची संधी मिळाली. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘सनातनच्या तिन्ही गुरूंचे प्रत्येक वाक्य हे ‘ब्रह्मवाक्य’च आहे. ते लगेचच सत्य होईल, असेही नाही. त्याला काही काळ लागू शकतो; परंतु ते सत्य होणार आहे, हे निश्चित. आपण तशी श्रद्धा ठेवू शकतो.’

२. प्रत्यक्ष गायनसेवा करतांना आलेल्या अनुभूती  

२ अ. देवीचे गीत गातांना देवीची मारक-तारक शक्ती संपूर्ण वातावरणात पसरल्याचे जाणवून उष्णता जाणवणे : नवरात्रीच्या चौथ्या दिवशी सौ. सायली करंदीकर आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत अभ्यासिका कु. मयुरी आगावणे यांनी देवीचे ‘आदिमाया अंबाबाई’ हे गीत गायले. त्यात मी त्यांना कोरसमध्ये (एकत्रित गायनात) साथ केली. तेव्हा देवीची मारक-तारक शक्ती संपूर्ण वातावरणात पसरल्यामुळे मला उष्णता जाणवत होती, तसेच मला माझ्या सहस्रारापासून अनाहतचक्रापर्यंत उष्णता जाणवत होती. मला सर्वत्र पिवळा प्रकाश दिसत होता.

२ आ. गायनसेवा सादर करतांना देवीचे पुष्कळ मोठे आणि प्रकाशमान रूप दिसणे अन् ‘गाण्याचा आवाज वर आकाशात जात आहे’, असे जाणवणे : नवरात्रीच्या सहाव्या दिवशी राजमातंगी यज्ञ झाल्यावर मी गायनसेवा सादर केली. ‘माय भवानी तुझे लेकरू’ हे गीत गातांना मला देवीचे पुष्कळ मोठे आणि संपूर्ण प्रकाशमान रूप दिसले. त्याला विशिष्ट आकार नव्हता, तसेच ‘माझ्या गाण्याचा आवाज केवळ रामनाथी आश्रमात नाही, वर आकाशात जात आहे’, असे मला जाणवले.

२ इ. राजमातंगीदेवीच्या आरतीचा सराव केला नसणे, आरती म्हणण्यापूर्वी देवीला प्रार्थना केल्यावर गुरुकृपेने कुठलीही अडचण न येता आरती व्यवस्थित अन् भावपूर्ण गायली जाणे : राजमातंगी यज्ञाच्या दिवशी मी महालक्ष्मीदेवीची आरती म्हणणार असल्याने त्याचा सराव केला होता. आरती म्हणण्यापूर्वी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ मला म्हणाल्या, ‘‘आज राजमातंगी यज्ञ झाला, तर राजमातंगीदेवीची आरती म्हण. दोन्ही आरतींची चाल एकसारखीच आहे. देवी आरती म्हणून घेईल.’’ प.पू. गुरुदेवांच्या अनंत कृपेमुळे मला त्याचा अजिबात ताण आला नाही. राजमातंगीदेवीला संपूर्ण शरण जाऊन प्रार्थना केल्यावर मला सूक्ष्मातून पांढरा प्रकाश दिसला. नंतर मी राजमातंगीदेवीची आरती गायली. राजमातंगीदेवी आणि प.पू. गुरुदेव यांच्या अनंत कृपेने आरती म्हणतांना कुठलीही अडचण न येता आरती भावपूर्ण गायली गेली.

तेव्हा मला जाणीव झाली, ‘आपल्या हातात काहीच नाही. एकदा आपण आपले सर्वस्व देवाच्या चरणी अर्पण केल्यावर देवच सर्वकाही करून घेतो. आपला समर्पणभाव पुष्कळ महत्त्वाचा आहे.’

२ ई. यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी गुरुकृपेने आरती म्हणण्याची सेवा मिळणे आणि आरतीच्या वेळी ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या रूपाने साक्षात् देवी समोर आहे’, असे जाणवणे : ५.१०.२०२२ या दिवशी यज्ञाची पूर्णाहुती होती. त्या दिवशी सकाळी अकस्मात् मला निरोप आला, ‘आज महाआरती गायन सेवा असणार आहे.’ तेव्हा माझ्याकडून प.पू. गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. ‘आरती गातांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या रूपाने साक्षात् देवी माझ्यासमोर आहे’, असे मला जाणवले.

३. कृतज्ञता

‘हे गुरुदेवा, हे आदिशक्ती माते, तुमच्याच अनंत कृपेने तुमच्या चरणी गायनसेवा अर्पण करता आली’, यासाठी तुमच्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– परात्पर गुरुदेवांची,

कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (३१.१०.२०२२) ॐ