ISRO : ‘विक्रम’ आनंदाने झोपी गेला, आता मंगळ आणि शुक्र येथे जाण्याची योजना ! – एस्. सोमनाथ, इस्रो

इस्रोचे प्रमुख एस्. सोमनाथ यांनी दिली माहिती

एस्. सोमनाथ

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘विक्रम’ने (विक्रम लँडरने) चांगले काम केले आहे आणि आता तो चंद्रावर आनंदाने झोपी गेला आहे. भविष्यात जर विक्रमला जागे व्हावे, असे वाटत असेल, तर तो तेव्हा जागा होईलच; पण त्यासाठी आम्हाला वाट पहावी लागेल. त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न चालूच रहातील, अशी माहिती इस्रोप्रमुख डॉ. एस्. सोमनाथ यांनी दिली आहे. चंद्रयान मोहिमेच्या वेळी ‘विक्रम लँडर’ने १४ दिवस  चंद्राच्या पृष्ठभागावरील महत्त्वपूर्ण माहिती गोळा केली. त्यानंतर १४ दिवसांनी तेथे रात्र चालू झाल्याने तो ‘स्लीप मोड’मध्ये गेला. याचा संदर्भ देत डॉ. सोमनाथ यांनी वरील वक्तव्य केले. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त रामेश्‍वरम्मध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

सौजन्य एएनआय न्यूज 

इस्रोच्या भविष्यातील अंतराळ संशोधनाच्या मोहिमांविषयी माहिती देतांना सोमनाथ म्हणाले की, अनेक शोधमोहिमा राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मंगळ आणि शुक्र ग्रहांवर जाण्याची आमची योजना आहे. पुन्हा कधीतरी चंद्रावर जाण्याचाही आमचा मानस आहेच. पृथ्वीच्या हवामानाच्या पट्ट्याजवळील तापमान आणि हवामान यांचा अभ्यास करण्यासाठीही नियोजन चालू आहे.

आजपासून साधारण पावणेदोन महिन्यांपूर्वी म्हणजे २३ ऑगस्ट या दिवशी ‘विक्रम’ लँडरने (अवतरकाने) चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या ‘सॉफ्ट लँडिंग’ केले होते. ही यशस्वी कामगिरी करणारा भारत हा केवळ चौथा देश आहे.