विविध उपक्रम राबवून आणि कौशल्य विकास अभ्यासक्रमाची सुविधा देऊनही बंदीवानांमध्ये सुधारणा अल्प ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

कोलवाळ कारागृहात क्षुल्लक कारणामुळे बंदीवानांमध्ये हाणामारी झाल्याचे प्रकरण

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

म्हापसा, १४ ऑक्टोबर (वार्ता.) : बंदीवानांची मानसिकता लहानसहान गोष्टींवरून भांडण करणारी आहे. चिकन वाढण्यासारख्या क्षुल्लक गोष्टीवरून मारामारी होते. विविध उपक्रम राबवून आणि कौशल्य विकास अभ्यासक्रमाची सुविधा देऊनही बंदीवानांमध्ये सुधारणा अल्प प्रमाणात होते. बंदीवानांची ही मानसिकता कधीतरी पालटेल, यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. कोलवाळ कारागृहात चिकन वाढण्यासारख्या क्षुल्लक कारणामुळे हल्लीच बंदीवानांमध्ये हाणामारी झाली होती. यात ३ बंदीवान घायाळ झाले होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत पेडे, म्हापसा येथे मैदानाची पहाणी करण्यासाठी आले असता बंदीवानांमध्ये मारामारी झाल्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला ते उत्तर देत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाला मी २ वेळा भेट दिलेली आहे. कारागृहात चांगली सुधारणा करण्यात आली आहे. बंदीवानांची मानसिकता पालटण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांना मोकळे सोडणे, विविध उपक्रम आणि कामे करून घेणे, वेगवेगळे प्रयोग राबवणे, योगासने करणे, प्रार्थना म्हणणे, असे उपक्रम चालू आहेत. कारागृहात गेल्या वर्षभरात विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम चालू करण्यात आले आहेत.’’