तब्बल ४० वर्षांनंतर भारत-श्रीलंका यांच्यातील फेरी (नौका) सेवेस प्रारंभ !

  • भारत-श्रीलंका संबंधांना अधिक सशक्त करण्यासाठीचे महत्त्वपूर्ण पाऊल ! – पंतप्रधान मोदी

  • वर्ष १९८२ मध्ये उत्तर श्रीलंकेत चालू झालेल्या यादवी युद्धामुळे दोन्ही देशांतील समुद्री वाहतूक झाली होती ठप्प !

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूचे नागपट्टिनम् आणि श्रीलंकेचे कांकेसंथुराई यांमध्ये फेरी (नौका) सेवा चालू करण्यात आली आहे. या सेवेच्या अंतर्गत प्रतीव्यक्ती ७ सहस्र ६७० रुपये भाडे असणार आहे. वर्ष १९८२ मध्ये उत्तर श्रीलंकेत चालू झालेल्या यादवी युद्धामुळे दोन्ही देशांतील समुद्री वाहतूक ठप्प झाली होती. ती आता या फेरी सेवेच्या माध्यमातून पुन्हा चालू करण्यात आली आहे.

याच्या उद्घाटन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान म्हणाले की, ही फेरी सेवा भारत-श्रीलंका संबंधांना अधिक सशक्त करण्यासाठीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात संस्कृती, वाणिज्य आणि सभ्यता यांचा एक प्रकारचा समान इतिहास आहे. आम्ही भारत आणि श्रीलंका यांच्यात राजनैतिक अन् आर्थिक संबंध यांच्या एका नव्या अध्यायाला आरंभ करत आहोत. ही नौका सेवा सर्व ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांना जिवंत बनवेल.

या वेळी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे म्हणाले की, उभय देशांतील वाहतूक उत्तर श्रीलंकेत झालेल्या यादवी युद्धामुळे बाधित झाली होती; परंतु आता या फेरी सेवेमुळे त्याला पुन्हा चालना मिळणार आहे.