सातारा, १३ ऑक्टोबर (वार्ता.) – खटाव तालुक्यातील वडूज येथील ‘चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थे’शी संबंधित ५ कर्मचारी ४ वर्षांपासून पसार होते. आर्थिक गुन्हे शाखा आणि वडूज पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून १२ लाख ९३ सहस्र रुपयांचे सोने शासनाधीन करण्यात आले आहे.
चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तत्कालीन संचालक, सर्व व्यवस्थापक, शाखाप्रमुख यांनी संगनमताने अपूर्ण कागदपत्रांद्वारे गृहतारण, कर्जवाटप, खोट्या ठेवी, संस्थेच्या नावावर अनावश्यक बँक खाते निबंधकांच्या अनुमतीविना उघडले. या प्रकरणी ४ वर्षांपूर्वी वडूज पोलीस ठाण्यामध्ये १८ कोटी २८ लाख ९२ सहस्र ३३४ रुपयांच्या अपहाराचा गुन्हा नोंद झाला होता.
या प्रकरणी आरोपींच्या घराची पडताळणी केली असता पतसंस्थेच्या ‘लॉकर’च्या चाव्या आढळून आल्या. पोलिसांनी आरोपीने सांगितलेल्या ‘लॉकर’मधून पंचनामा करून सोने कह्यात घेतले, तसेच या प्रकरणी पोलिसांना हव्या असलेल्या आणखी १० आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची अनुमती जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिली आहे.
संपादकीय भूमिकास्थानिक स्तरावरील गुन्हेगार वर्षानुवर्षे पसार असणे, हे पोलिसांना लज्जास्पद नव्हे का ? |