आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने रशियाच्या ऑलिंपिक समितीची मान्यता केली रहित !

युक्रेनच्या ४ भागांना स्वतंत्र घोषित करून त्यांची स्वतंत्र प्रांतीय ऑलिंपिक संघटना घोषित केल्यावरून कारवाई !

‘आयओसी’ने रशियन ऑलिम्पिक समितीला अपात्र ठरवले !

नवी देहली : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (‘आयओसी’ने) रशियाच्या ऑलिंपिक समितीची मान्यता रहित केली आहे. आयओसीच्या प्रवक्त्यांनी एका पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रशियाने आयओसीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळेच त्याच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. ‘असे असले, तरी रशियन खेळाडू रशियन पारपत्रासह पुढील वर्षी पॅरिस येथे होणार्‍या ऑलिंपिकमध्ये सहभाग घेऊ शकणार आहेत’, असेही आयओसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

रशियाने आयओसीच्या नियमांचे उल्लंघन करत ‘डोनेट्स्क पीपल्स रिपब्लिक’, ‘खेरसॉन’, ‘लुहान्स्क पीपल्स रिपब्लिक’ आणि ‘जापोरिजीया’ या क्षेत्रांना प्रांतीय ऑलिंपिक संघटनेची मान्यता दिली. हे आयओसीच्या नियमांच्या विरोधात आहे. ही सर्व क्षेत्रे आधी युक्रेनचा भाग होती; परंतु रशियाने त्यांवर आक्रमण करून त्यांना स्वतंत्र घोषित केले.

पंतप्रधान मोदी मुंबईत आज करणार आयओसीच्या १४१ व्या सत्राचे उद्घाटन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ ऑक्टोबर या दिवशी मुंबईतील ‘जियो वर्ल्ड सेंटर’मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सत्राचे उद्घाटन करणार आहेत. आयओसीचे सत्र त्याच्या सदस्यांच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीच्या रूपात कार्य करते. भारतात ४० वर्षांनंतर या बैठकीचे आयोजन होणार आहे. याआधी वर्ष १९८३ मध्ये आयओसीच्या ८६ व्या सत्राचे आयोजन भारतात करण्यात आले होते.