१. औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालतांना श्री दत्तात्रेयांना प्रार्थना करणे
‘मी पितृपक्षात प्रतिदिन देवद आश्रमाच्या परिसरात असलेल्या औदुंबर वृक्षाला १ घंटा प्रदक्षिणा घालते. १२.९.२०२२ या दिवशी मी प्रदक्षिणा घातल्या आणि प्रदक्षिणा झाल्यावर श्री दत्तात्रेयांना प्रार्थना केली, ‘माझ्या पूर्वजांना गती मिळू दे. पूर्वजांच्या त्रासांपासून माझे आणि माझ्या कुटुंबियांचे रक्षण करा. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी आमच्याकडून चिकाटीने प्रयत्न करून घ्या. माझा प्रत्येक क्षण साधना आणि गुरुसेवा करण्यासाठी वापरला जाऊ दे. मी वैकुंठात (आश्रमात) घेत असलेल्या प्रसादाच्या प्रत्येक कणाचा उपयोग माझ्याकडून धर्मकार्य करण्यासाठी होऊ दे. हे श्री दत्तात्रेया, मला साधना करण्याची सद़्बुद्धी देऊन साधनेचे प्रयत्न करण्यासाठी तुम्हीच मला शक्ती, बुद्धी आणि स्फूर्ती द्या.’
२. प्रार्थना केल्यावर औदुंबर वृक्षाची ५ – ६ पाने आणि वृक्षावर साचलेले पाणी डोक्यावर पडणे अन् याद्वारे ‘गुरु दत्तात्रेयांचा आशीर्वाद मिळाला’, असे वाटून भाव जागृत होणे
प्रार्थना करताक्षणी वारा वहात नसतांनाही औदुंबर वृक्षाची ५ – ६ पाने माझ्या डोक्यावर पडली. दुसर्या क्षणी वृक्षावर साचलेले पाणीही माझ्या डोक्यावर पडले. मी १ घंटा प्रदक्षिणा घालत होते; पण तेव्हा पाने किंवा पाणी पडले नव्हते. मी प्रार्थना केली आणि पाने अन् पाणी माझ्या डोक्यावर पडले. त्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला आणि कृतज्ञताही वाटली.
‘झाडाची पाने माझ्या डोक्यावर पडली’, म्हणजे ‘गुरु दत्तात्रेयांनी मला आशीर्वाद दिला’ आणि ‘डोक्यावर पाणी पडले’, म्हणजे ‘गुरुकृपेचा वर्षाव झाला’, असे मला वाटले. या विचारांनी माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि ‘प्रत्येक क्षणी ईश्वर माझ्या समवेत आहे’, याची अनुभूती आली.
३. अन्य वेळी ५ मिनिटे प्रदक्षिणा घालतांना शारीरिक त्रास होणे; पण पितृपक्षात १ घंटा प्रदक्षिणा घालूनही तो न होणे
मी एरव्हीही प्रतिदिन ५ मिनिटे या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालते. त्या वेळी माझी कंबर आणि पाय भरून येतात; पण पितृपक्षात १ घंटा प्रदक्षिणा घालतांना तसे झाले नाही. ‘हा वेळ कसा जातो’, तेही मला कळत नाही. तेव्हा माझ्या मनात विचार येतो, ‘पितृपक्षात पितरांच्या त्रासापासून माझी सुटका व्हावी; म्हणून श्री दत्तात्रेय मला शक्ती देऊन प्रदक्षिणा पूर्ण करून घेतात. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मीना अरविंदराव खळतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.९.२०२२)