पुणे येथील (कै.) श्रीमती शुभदा अच्‍युत जोशी (वय ७५ वर्षे) यांची त्‍यांच्‍या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये, तसेच त्‍यांच्‍या आजारपणात, निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे !

१३.९.२०२३ या दिवशी पुणे येथील साधिका (कै.) श्रीमती शुभदा अच्‍युत जोशी (वय ७५ वर्षे) यांचे निधन झाले. १३.१०.२०२३ या दिवशी त्‍यांचे मासिक श्राद्ध आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या कुटुंबियांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये, तसेच त्‍यांच्‍या शेवटच्‍या आजारपणात, निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

(कै.) श्रीमती शुभदा जोशी

१. श्री. नीलेश अच्‍युत जोशी ((कै.) श्रीमती शुभदा जोशी यांचा मुलगा), पुणे

१ अ. ‘आईचा ((कै.) श्रीमती शुभदा जोशी यांचा) स्‍वभाव मुळातच शांत आणि सहनशील होता.

१ आ. मुलांवर साधनेचे संस्‍कार करणे : आईला तिच्‍या लहानपणापासून पूजापाठ करण्‍याची आवड होती. तिने आम्‍हा दोघा भावंडांवरही (मी आणि माझी लहान बहीण डॉ. (सौ.) स्‍वाती भाटे यांच्‍यावरही) लहानपणापासून ‘पूजा करणे, स्‍तोत्र म्‍हणणे’, यांसारखे संस्‍कार केले.

१ इ. विद्यार्थ्‍यांची आवडती शिक्षिका असणे : ती बोंडशेत (तालुका माणगाव, जिल्‍हा रायगड) येथील शाळेत शिक्षिका होती. ती विद्यार्थ्‍यांची आवडती शिक्षिका होती. त्‍यामुळे तिचे ‘स्‍थलांतर होऊ नये’, यासाठी गावकर्‍यांनी ३ – ४ वेळा प्रयत्न केले होते.

१ ई. सनातन संस्‍थेशी संपर्क आणि साधनेला आरंभ : वर्ष १९९८ पासून मी सनातन संस्‍थेच्‍या सत्‍संगाला जाऊ लागलो. तेव्‍हापासून माझ्‍या आई-वडिलांचाही सनातन संस्‍थेशी संपर्क आला. आई-वडिलांनी मला संस्‍थेच्‍या माध्‍यमातून साधना आणि सेवा करण्‍यास कधीच विरोध केला नाही. आईने ‘कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करणे, ग्रंथवाचन करणे’, या माध्‍यमांतून साधनेला आरंभ केला.

१ उ. विविध प्रकारच्‍या सेवा करणे : वर्ष २००० मध्‍ये माझे शिक्षण पूर्ण झाल्‍यावर तिने नोकरीतून स्‍वेच्‍छानिवृत्ती घेतली. त्‍यानंतर तिने गोरेगाव (तालुका माणगाव, जिल्‍हा रायगड) येथे समष्‍टी सेवा करण्‍यास आरंभ केला. वर्ष २००६ मध्‍ये माझ्‍या वडिलांच्‍या (अच्‍युत जोशी यांच्‍या) निधनानंतर आम्‍ही सर्व जण चिंचवड (पुणे) येथे रहायला आल्‍यानंतर ती ‘घरी होणार्‍या सत्‍संगाची सिद्धता करणे, सात्त्विक उत्‍पादनांचे वितरण करणे’, अशा सेवा करत असे.

१ ऊ. शेवटचे आजारपण

१ ऊ १. मेंदूला दुखापत झाल्‍यावर बेशुद्धावस्‍थेत असतांना गुरुकृपेने केवळ ४ दिवसांत बरी होणे आणि त्‍यानंतर मेंदूचे काम मंदावून अंथरुणाला खिळणे : पुणे येथे बहिणीकडे रहात असतांना २३.४.२०२३ या दिवशी ती घरात पडली आणि तिच्‍या मेंदूला दुखापत झाली. त्‍यानंतर ती बेशुद्धावस्‍थेत (‘कोमा’त) गेली. त्‍या वेळी आधुनिक वैद्यांनी ‘ती काही घंटेच जिवंत राहील’, असे सांगितले होते; पण गुरुकृपेमुळे ती केवळ ४ दिवसांमध्‍येच त्‍या शारीरिक स्‍थितीतून बाहेर आली; मात्र मेंदूत झालेल्‍या रक्‍तस्रावामुळे तिच्‍या मेंदूचे कार्य मंदावले. त्‍यानंतर ती अंथरुणाला खिळून राहिली.

१ ए. निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे

१ ए १. नामजपादी उपायांना प्रतिसाद देत असल्‍याचे जाणवणे : मे २०२३ पासून तिच्‍यात पुष्‍कळ पालट दिसून आले. त्‍या वेळी मला जाणवत असे, ‘आईला उपायांसाठी सांगितलेला नामजप ती ऐकत आहे आणि ती तो म्‍हणण्‍याचा प्रयत्न करत आहे, तसेच आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपायांना ती प्रतिसाद देत आहे.’

१ ए २. ‘आईची अंतर्मनातून साधना चालू आहे’, असे वाटणे : निधनाआधी १५ दिवस ती ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव, तसेच श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची छायाचित्रे सतत पहात असे. ‘ती गुरुदेवांना आत्‍मनिवेदन करत आहे’, असे मला जाणवत असे. असह्य वेदना सहन करतांनाही तिच्‍या तोंडवळ्‍यावरील शांती आणि हास्‍य टिकून होते.

१ ऐे. निधन : १२.९.२०२३ या दिवशी सायंकाळी ५ वाजता तिच्‍या रक्‍तातील प्राणवायूचे प्रमाण आणि रक्‍तदाब न्‍यून झाल्‍यामुळे तिला पुन्‍हा रुग्‍णालयात भरती करावे लागले. १३.९.२०२३ या दिवशी सकाळी ७.३० वाजता तिची प्राणज्‍योत मालवली.

१ ओ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे

१. आईचे निधन झाल्‍यावर तिला रुग्‍णालयातून घरी आणले. त्‍यानंतर साधारण एक घंट्याने पिवळ्‍या रंगाचे एक मोठे फुलपाखरू घरात आले आणि ते बराच वेळ घरात बसून होते.

२. आईच्‍या तोंडावळा पिवळसर दिसत होता.

३. तिच्‍या देहाच्‍या आजूबाजूला बरेच दैवी कण दिसत होते.

४. ‘ती शांतपणे झोपली आहे’, असे आम्‍हाला वाटत होते.

५. घरातील वातावरणात जडपणा न जाणवता हलकेपणा वाटत होता. काही साधकांनीही हे अनुभवले.

या अनुभूतींच्‍या माध्‍यमातून आम्‍हा सर्वांना गुरुदेवांचे अस्‍तित्‍व अनुभवता आले.

१ औ. संत आणि साधक यांची अनुभवलेली प्रीती ! : मागील ४ मासांच्‍या आजारपणात आईला सद़्‍गुरु सत्‍यवानदादा (सद़्‍गुरु सत्‍यवान कदम), सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका, पू. सदाशिव परांजपे (सनातनचे ८९ वे संत, वय ८० वर्षे) आणि पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे (सनातनच्‍या ९० व्‍या संत, वय ७५ वर्षे), तसेच पू. (श्रीमती) माया गोखले (सनातनच्‍या ८१ व्‍या संत, वय ७८ वर्षे) या संतांचे प्रत्‍यक्ष दर्शन लाभले. या कालावधीत सद़्‍गुरु स्‍वाती खाडयेताई आणि पू. (सौ.) मनीषा महेश पाठकताई (सनातनच्‍या १२३ व्‍या संत, वय ४१ वर्षे) यांनी आईसाठी नामजपादी उपाय सांगितले. त्‍या आईची विचारपूस करत असत.

आईला रुग्‍णालयात नेल्‍यानंतर, तसेच तिचे अंत्‍यविधी पूर्ण होईपर्यंत लांजा (जिल्‍हा रत्नागिरी) येथील साधकांनी आम्‍हाला सर्व स्‍तरांवर साहाय्‍य केले.

‘हे सर्व अनुभवायला दिल्‍याबद्दल गुरुदेव, सर्व संत आणि साधक यांच्‍याप्रती कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरी ती अल्‍प आहे !’

२. सौ. प्रीती नीलेश जोशी ((कै.) श्रीमती शुभदा जोशी यांची सून), पुणे

अ. ‘इतर वेळी आमच्‍या घराजवळ कावळा येत नाही; परंतु सासूबाईंच्‍या निधनानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी एक कावळा घराजवळ येऊन जोरात ओरडत होता. त्‍याच्‍यासाठी भाताचा घास ठेवल्‍यावर त्‍याने तो लगेच खाल्ला.

आ. संध्‍याकाळी एक वासरू आले. त्‍याला खायला दिल्‍यावर त्‍याने ते लगेच खाल्ले. त्‍याच्‍याशी बोलत असतांना ते हुंकार देत होते. त्‍या वेळी ‘जणूकाही माझे बोलणे त्‍याला समजत असून ते प्रतिसाद देत आहे’, असे मला जाणवत होते.’

३. कु. ऋग्‍वेद जोशी ((कै.) श्रीमती शुभदा जोशी यांचा नातू, आध्‍यात्‍मिक पातळी ६१ टक्‍के, वय १६ वर्षे), पुणे

अ. ‘आजीचे निधन झाल्‍यानंतर तिला रुग्‍णालयातून घरी आणल्‍यावर ‘तिच्‍या देहाच्‍या वर भगवान श्रीकृष्‍णाचे सुदर्शनचक्र सतत फिरत आहे’, असे मला जाणवले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १३.९.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक