गोवा : ३ अल्पवयीन मुलांनी त्यांच्या अल्पवयीन मित्राला १८ वेळा ‘बॅट’ने शरिरावर प्रहार करून केले घायाळ !

गांजाच्या व्यसनामुळे मिरामार येथे अल्पवयीन मुलांमध्ये घडला मारहाणीचा प्रकार !

(प्रतिकात्मक चित्र)

पणजी, ११ ऑक्टोबर (वार्ता.) : गांजाच्या सेवनाचे व्यसन असलेल्या ४ अल्पवयीन मुलांमध्ये गांजावरून भांडण झाले. या वेळी ३ अल्पवयीन मुलांनी चौथ्या अल्पवयीन मुलावर १८ वेळा ‘बॅट’ने हाता-पायावर आणि डोक्यावर अमानुष मारहाण केली. यामुळे घायाळ झालेल्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यातून रक्तस्राव चालू झाला, तसेच हाता-पायाची हाडेही मोडली. मारहाणीनंतर तिघे अल्पवयीन घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी घायाळ मुलाला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात भरती केले. घायाळ झालेल्या मुलाची प्रकृती गंभीर असल्याने त्याची साक्ष नोंदवण्यास आधुनिक वैद्यांनी नकार दर्शवला आहे.

१. पोलिसांनी मारहाण केलेल्या तिघा मुलांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या मुलांना कह्यात घेऊन त्यांची मेरशी येथील ‘अपना घरा’त रवानगी करण्यात आली आहे. या घटनेमुळे राज्यात अल्पवयीन मुले अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याने पालकांसह राज्यासाठी ही एक चिंतेची गोष्ट ठरली आहे.

२. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घायाळ झालेला मुलगा आणि मारहाण करणारे तिघे हे सर्व चांगले मित्र होते अन् ते एकत्रपणे गांजाचे सेवन करायचे. आजच्या प्रकरणात मारहाणीत घायाळ झालेल्या मुलाने काही दिवसांपूर्वी मारहाण करणार्‍या तिघांपैकी एका मुलाला गांजा न दिल्यावरून ‘बॅट’ने मारहाण केली होती. याचा वचपा काढण्यासाठी तिघांनी मिळून या मुलाला आज मारहाण केली.

(सौजन्य : Prudent Media Goa) 

पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्यानेच घडले प्रकरण

उपलब्ध माहितीनुसार सध्या घायाळ झालेल्या मुलाने ज्या मुलाला गांजा न दिल्यावरून पूर्वी मारहाण केली होती, तो मुलगा तक्रार देण्यासाठी पणजी पोलीस ठाण्यात गेला होता; मात्र पोलिसांनी त्याच्या तक्रारीची नोंद घेतली नाही. त्यामुळे मित्राला अद्दल घडवण्यासाठी त्याने ‘लेक व्हू’, मिरामार येथे ये, गांजा देतो’, असे सांगून बोलावले आणि अन्य २ साथीदारांसह त्याला मारहाण केली. (पोलिसांनी वेळीच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले असते, तर पुढील मोठी घटना टळली असती, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • अमली पदार्थांच्या व्यसनाचा अल्पवयीन मुलांवर गंभीर परिणाम ! अल्पवयीन मुले अमली पदार्थांच्या विळख्यात अडकण्याला उत्तरदायी कोण ?
  • आतातरी पोलीस आणि प्रशासन यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन राज्यातील भावी पिढीला वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत !