इस्रायलकडून ‘फॉस्फरस बाँब’चा वापर ! – पॅलेस्टाईनचा आरोप

हवेतील प्राणवायू संपवून हाडे वितळवतो फॉस्फरस बाँब !

जेरुसलेम – इस्रायलने हवेतील प्राणवायू (ऑक्सिजन) संपवून हाडे वितळवणार्‍या ‘फॉस्फरस बाँब’चा वापर केल्याचा आरोप पॅलेस्टाइनने केला. इस्रायलची ही कृती युद्ध गुन्हेगारी असल्याचेही पॅलेस्टाईनने म्हटले आहे.

किती घातक असतो फॉस्फरस बॉम्ब ?

व्हाईट फॉस्फरस बाँब सिद्ध करतांना रबर आणि व्हाईट फॉस्फरस यांचा वापर करण्यात येतो. फॉस्फरस मेणासारखे रसायन असते. हा बाँब दिसायला फिक्कट पिवळा किंवा रंगहीन असतो. त्यातून सडलेल्या लसनासारखा वास येतो. ऑक्सिजनच्या संपर्कात येताच तो पेट घेतो. ही आग पाण्याने विझवता येत नाही. फॉस्फरस बाँब पडल्यावर त्या भागातील ऑक्सिजन वेगाने संपू लागते. त्यामुळे जी माणसे बाँबमुळे लागलेल्या आगीतून वाचतात, त्यांचा श्‍वास कोंडून जीव जातो.

पाणी टाकल्यानंतर उलट धुराचे लोट निर्माण करत तो अधिक पसरतो. फॉस्फरस बाँब १३०० डिग्री सेल्सिअसपर्यंत पेटू शकतो. त्यामुळे हाडेही वितळतात. या बाँबच्या संपर्कात आलेली व्यक्ती वाचलीच, तरीही त्याला आयुष्यभर मरणयातना सहन कराव्या लागतात. तिला सातत्याने गंभीर संक्रमणाचा सामना करावा लागतो. त्वचेवरील संसर्ग बर्‍याचदा रक्तापर्यंत पोहोचतो. त्यामुळे हृदय, यकृत आणि मूत्रपिंड यांची हानी होते. यामुळे शरीरातील अनेक अवयव बंद पडण्याची शक्यता वाढते. हा अत्यंत धोकादायक बाँब मानला जातो.