स्‍वतःचा वेळ वाया घालवणे, हे देवाचा वेळ वाया घालवण्‍यासारखे आहे !

पू. संदीप आळशी

‘देवाने आपल्‍याला साधनेसाठी पृथ्‍वीवर जन्‍म दिला आहे; मात्र काही साधक अनावश्‍यक विषयांवर बोलणे, भ्रमणभाषवर (मोबाईलवर) गप्‍पा मारणे, भ्रमणभाष किंवा दूरचित्रवाणी संच (टीव्‍ही) यांवर मनोरंजनपर कार्यक्रम पहाणे इत्‍यादींमध्‍ये वेळ वाया घालवतात. आपण जेव्‍हा साधना करतो, तेव्‍हा आपण स्‍वतःला विसरून गुरुचरणी किंवा ईश्‍वरचरणी समर्पित होण्‍याचा प्रयत्न करत असतो. त्‍यामुळे आपला स्‍वतःचा वेळ हासुद्धा स्‍वतःचा कुठे रहातो ? तो देवाचाच होतो ! असे असतांना आपल्‍याला वेळ घालवण्‍याचा अधिकार कुठे रहातो ?

पूर्वी मी कधी कधी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍याकडे माझ्‍या सेवेतील शंका विचारण्‍यासाठी जात असे. ते संगणकावर ग्रंथांचे लिखाण पडताळण्‍याची सेवा करत असत. ‘त्‍यांचे अर्धवट पडताळून झालेले लिखाण पूर्ण पडताळून होईपर्यंत जरा थांबूया’ असा विचार करून मी काही क्षण तसाच उभा रहायचो. ‘मी थांबलो आहे’ हे त्‍यांच्‍या लक्षात आल्‍यावर ते त्‍यांची सेवा लगेच थांबवायचे आणि मला म्‍हणायचे, ‘‘अरे, लगेच विचारायला हवे होते; थांबण्‍यात वेळ कशाला घालवला ?’’ सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टर ‘दुसर्‍याचाही वेळ वाया जाऊ नये’ याचा एवढा विचार करतात, तर आपण निदान स्‍वतःच्‍या वेळेचा विचार तरी करायला नको का ?

वाया गेलेला वेळ पुन्‍हा कधीच भरून येत नाही; म्‍हणून ‘आपला क्षण न् क्षण सत्‌साठीच सार्थकी लागेल’ याची दक्षता आपणच घेतली पाहिजे. असे केल्‍याने आपली साधना चांगली होऊन साधनेत शीघ्र प्रगती होईल.’

– पू. संदीप आळशी (२७.९.२०२३)