१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन
‘आपल्याला संतांना ओळखायचे असेल, तर भाषा, वेश आणि त्यांचे एकंदर वागणे यांवरून संतपदाचे लक्षण ठरवता येणार नाही. ज्यांच्या दर्शनाने विषयांचा विसर पडून मनुष्याचे हृदय आनंदाने भरून जाते, तीच संतांची खूण म्हणून समजावी.’ – प.पू. कलावतीआई, बेळगाव (साभार : ‘बोधामृत’, प्रकरण : ‘संत संगती’, सुवचन क्र. १)
२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन
२ अ. प्रेमाचा दुष्काळ असलेले सध्याचे जग आणि संतसंगतीचे महत्त्व !
२ अ १. लोकांच्या मनात विषयासक्ती दडलेली असणे आणि एकत्र कुटुंबपद्धत मोडीत निघाल्यामुळे सध्या समाजात प्रेमाचा दुष्काळ असणे : ‘प.पू. कलावतीआईंना ‘येणार्या काळात काय घडणार आहे ?’, याचे ज्ञान होते. सध्या जग हे पोशाखी झाले आहे. ‘झकपक कपडे, मधुर बोलणे, मृदू वागणे’, असे आजच्या लोकांचे वर्तन असले, तरी त्यांच्या मनात विषयासक्ती दडलेली असते. जगातील एकत्र कुटुंबपद्धत मोडीत निघाल्यामुळे सध्या समाजात प्रेमाचा दुष्काळ आहे. प्रेम कुणालाच मिळत नसल्यामुळे समाजात पैसा, प्रतिष्ठा आणि सत्ता यांवर प्रेम करणारे लोक भरपूर वाढले आहेत.
२ अ २. सध्याच्या स्थितीत कुणाचेच प्रेम मिळत नसल्याने माणसाला मायेतील विषयांतच समाधान वाटत असणे : माणसाला मानसिक समाधान हवे असते. ते प्रेमामुळे मिळते. ते सर्वोच्च असते; परंतु हे प्रेम आज समाजातून नष्ट होतांना दिसत आहे. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धत होती. त्यामध्ये मुलांना आजी-आजोबांचे प्रेम मिळत असे आणि आजी-आजोबांना मुलांचे प्रेम मिळत असे; परंतु आज परिस्थिती पालटली आहे. हल्ली अनेकदा आजी-आजोबांना वृद्धाश्रमामध्ये ठेवले जाते, तसेच मुले लहान वयातच पाळणाघरांमध्ये ठेवली जातात. त्यामुळे त्यांना कुणाचेच प्रेम मिळत नाही. प्रेम न मिळाल्यामुळे माणसाला ‘चांगले चांगले कपडे, मोठे घर, ऐश्वर्यात रहाणे आणि पुष्कळ पैसा जवळ असणे’, यांतच समाधान वाटते.
२ अ ३. संतांचे निरपेक्ष प्रेम मिळाल्यावर माणसाला विषयांचा विसर पडून त्याचे हृदय आनंदाने भरून जात असणे : फार पूर्वी समाजात माणुसकी, मर्यादा आणि विवेक हे जागृत अवस्थेत होते; परंतु हळूहळू त्यांचा लोप होत गेला. माणसाला प्रेमासाठी भटकावे लागते. त्याच्या आयुष्यात संतांचे निरपेक्ष प्रेम मिळण्याचा योग आला, तर तो विषयांपासून दूर जातो. आपण संतांना ‘भाषा, वेश आणि त्यांचे वागणे’, यांवरून ओळखू शकत नाही. ज्यांच्या दर्शनाने विषयांचा विसर पडून मनुष्याचे हृदय आनंदाने भरून जाते, तीच संतांची खूण समजावी. संतांना कसलीही आसक्ती नसते. ते आपला संसार प्रामाणिकपणे करतात आणि जमेल तसा परमार्थही करत रहातात. अशी माणसे पोशाखी नसतात. ती सडेतोड बोलणारी असतात; परंतु बोलतांना कुणाचे हृदय दुखावत नाहीत.
एखाद्या माणसाला संतांची संगत लाभली, तर संतांच्या अमृत दृष्टीने त्याच्या हृदयाचे परिवर्तन होते. तो विषयांपासून दूर जातो; म्हणून माणसाने कुठल्याही परिस्थितीत भक्तीमार्ग सोडू नये. भक्ती ही श्रद्धेतून निर्माण होते. श्रद्धा ही माणसाचे पवित्र मन आणि सात्त्विक विचार यांतून निर्माण होते. श्रद्धा निर्माण होण्यासाठी माणसाला संतसंगतीची आवश्यकता असते.
२ आ. अनेक संतांनी समाजाला वेळोवेळी कीर्तनाच्या माध्यमातून उपदेश केलेला असणे : आपले भाग्य थोर; म्हणून भारत देशात अनेक संत होऊन गेले. त्यांमध्ये मुख्य म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, संतशिरोमणी तुकाराम महाराज, संत गोरा कुंभार, संत नामदेव, संत एकनाथ, संत सावता माळी, अशा अनेक संतांनी समाजाला वेळोवेळी कीर्तनाच्या माध्यमातून उपदेश केला. स्वतःच्या आचरणातून समाजाला जीवन जगण्याचे सुंदर शिक्षण दिले; परंतु समाजातील घातक विचारांच्या काही माणसांमुळे समाजातील दुःख नेहमी वाढतच राहिले.
संत तुकोबाराय म्हणतात, ‘बहुत सुकृताची जोडी । म्हणूनी विठ्ठल आवडी ॥’, म्हणजे ‘पुष्कळ सत्कर्मांची जोड मिळाली की, विठ्ठलाविषयी आवड (भक्ती) निर्माण होते.’
समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥’ (मनाचे श्लोक, श्लोक २), म्हणजे ‘हे मना, तू भक्तीमार्गाने जा, म्हणजे तुला श्रीहरीची भेट होईल.’
२ इ. संतांच्या संगतीत राहिल्यामुळे विषयासक्ती नाहीशी होऊन माणून शाश्वत सुखाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागणे : जगात अनेक प्रकारची माणसे असतात. माणूस काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा विकारांनी पूर्णपणे वेढलेला असतो. माणूस आणि शाश्वत सुख यांमध्ये एक पडदा असतो. प.पू. कलावतीआई म्हणतात, ‘या पडद्यावर अनेक प्रकारची चित्रे आणि भले-बुरे प्रसंग दिसत असतात. तेे भ्रामक असतात. ते एखाद्या स्वप्नाप्रमाणे असतात. जसे डोळे उघडताच आपल्याला वास्तवाची जाणीव होते, तसे संतांच्या संगतीत आल्यावर आपल्याला शाश्वत सुखाचा मार्ग सापडतो; म्हणून संतसंगती ही जगाला नेहमीच उपकारक ठरलेली आहे.’
प.पू. कलावतीआई म्हणतात, ‘संत पोशाखी नसतात. विनम्र असतात. ते सगळ्यांत गुंतलेले असतात आणि तरीही ते पूर्णपणे विरक्त असतात. त्यांचे नाते ईश्वराशी जोडलेले असते. त्यांचे हृदय सात्त्विकतेने भरलेले असते. त्यांच्या हृदयामध्ये प्रेमाचा सागर असतो. ते आपल्या संगतीत येणार्या माणसांवर आपले बोलणे आणि पहाणे यांतून सुखाचा वर्षाव करतात.’
संतांना ओळखणे फार कठीण असते. ते सामान्य माणसासारखे दिसतात, वागतात आणि सदैव दुसर्यांच्या साहाय्यासाठी तत्पर असतात, तसेच ते स्वतःचा संसारही तितकाच प्रामाणिकपणे करत असतात; म्हणून प.पू. कलावतीआई म्हणतात, ‘संतांच्या संगतीत राहिल्यामुळे विषयासक्ती नाहीशी होऊन माणूस शाश्वत सुखाच्या मार्गाने चालू लागतो.’
– (पू.) किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (१६.८.२०२३)