१० ऑक्टोबर या दिवशी असलेल्या ‘जागतिक मानसिक आरोग्य दिना’च्या निमित्ताने..
१. इतरांच्या वागण्याचा मनुष्यावर परिणाम होऊन त्यातून विविध मानसिक व्याधी उद़्भवणे
‘मनुष्य स्वभावतः इतरांचे वागणे, इतरांच्या कृती, इतरांचे स्वभावदोष, तसेच परिस्थिती यांचा विचार प्रथम करतो. स्वतःच्या संदर्भात घडणार्या वाईट गोष्टींसाठी तो इतरांना दोषी ठरवत असतो. आपण पाहिले असेल की, मनुष्य बर्याचदा इतरांचे स्वतःविषयीचे वागणे बघून त्याचा स्वतःला त्रास करून घेतो. त्यातून चिंता, काळजी, निराशा इत्यादी अनेकविध गोष्टी तो मागे लावून घेतो.
२. श्रीमद़्भगवद़्गीतेतून भगवंताने मानवाला केलेला उपदेश
२ अ. सहसाधकांच्या वागण्याविषयी आक्षेप वाटल्याने मनाला अस्वस्थता येणे : काही प्रसंगांत मला अन्य काही साधकांच्या वागण्यामध्ये काही तरी चुकते आहे, असे वाटत होते. त्यामुळे माझ्या मनाला अस्वस्थता येत होती. त्या प्रसंगांवर घेतलेल्या स्वयंसूचना माझे अंतर्मन स्वीकारत नव्हते. त्या वेळी मला महाभारताच्या युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशातील (श्रीमद़्भगवद़्गीतेतील) एक भाग आठवला.
२ आ. महाभारताच्या युद्धाच्या वेळी शोकग्रस्त अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने ‘प्रत्येक जण त्याच्या प्रकृतीनुसार वागत असल्याने त्याच्याविषयी शोक करू नको’, असे सांगणे : महाभारताच्या युद्धाच्या वेळी आपले आप्त, मित्र, गुरुजन यांना युद्धासाठी लढायला उभे राहिलेले पाहून अर्जुनाला अत्यंत शोक होतो. ‘या सगळ्यांना मारून त्रैलोक्याचे राज्य मिळाले, तरी त्याचा काय उपयोग ?’, या विचाराने तो दुःखी होऊन शस्त्र खाली ठेवतो. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला सांगितले, ‘तू आणि हे सर्व राजेलोक प्रकृतीतून उत्पन्न झाला आहात. प्रत्येक जण आपापल्या प्रकृतीनुसार (त्रिगुणांच्या प्रभावानुसार) वागतो. त्यामुळे तू त्यांच्यासाठी शोक करू नकोस.’
२ इ. इतरांची प्रकृती पालटणे आपल्या हाती नसल्याने आपण त्यांच्या वागण्याविषयी शोक करू नये : तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘भगवंताने अर्जुनाला युद्धाच्या वेळी उपदेश केला. माझ्यासाठी मी हा कसा लागू करायचा ?’ तेव्हा मला जाणीव झाली, ‘मी आणि माझ्या आजूबाजूचा समाज हाही त्यांच्या प्रकृतीनुसार, म्हणजे त्रिगुणांच्या प्रभावानुसार वागणारा आहे. आपण कुणाची प्रकृती पालटू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या वागण्याविषयी मी शोक करता कामा नये.’
२ ई. शोक न करणे, म्हणजे प्रत्येक जण आपल्या प्रकृतीनुसार वागत असल्याचे न जाणून घेऊन वारंवार त्याचा उच्चार न करून दुःख वाटून न घेणे : तेव्हा मला प्रश्न पडला, ‘मी शोक करू नये म्हणजे काय ?’ त्यावर भगवंताने सुचवले, ‘शोक म्हणजे विलाप, खेद, दुःख. मला इतरांच्या वागण्यामुळे दुःख होते. ते माझ्या मनाविरुद्ध वागतात; म्हणून मला वाईट वाटते. त्याचा मी वारंवार विचार करतो आणि दुःख वाटून घेतो. मी आणि समोरची व्यक्ती आपापल्या प्रकृतीनुसार वागत असल्याने आम्हा दोघांच्या प्रकृतींमध्ये संघर्ष होतो. तो सहन न झाल्याने मला खेद वाटतो. प्रत्येक जण प्रकृतीनुसार वागत असल्याचे जाणून घेऊन मी वारंवार त्याचा उच्चार करणे टाळले पाहिजे.’
३. मनुष्याने साधना केली, तर त्याच्या अंगी आत्मबळ निर्माण होऊन ते प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जातांना उपयोगी पडणे
आज समाजामध्ये अनेक प्रकृती असून त्यांचा परिणाम मानवी मनावर होत असतो. त्यांच्यात संघर्ष उत्पन्न होऊन आणि त्या संघर्षाला तोंड देण्याची क्षमता मानवी मनामध्ये अल्प असल्याने त्यांतून विविध मानसिक व्याधींचा उगम होतो. यासाठी मनुष्य शारीरिक आणि मानसिक स्तरांवर उपचार करण्याचा प्रयत्न करतो; मात्र यावर खरा उपचार, म्हणजे साधना अन् धर्मपालन करणे हा होय. मनुष्याने साधना केली, धर्मपालन केले, तर त्याच्या अंगी आत्मबळ निर्माण होते. ते आत्मबळ विविध प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जातांना मनुष्याला उपयोगी पडते. ज्या गोष्टी मनुष्य शारीरिक स्तरावर प्रयत्न करून पालटू शकतो, ते पालटण्यासाठी, तसेच जे पालटणे क्षमतेपलिकडचे आहे, त्याकडे साक्षीभावाने पहाणे आणि ते सहन करणे यासाठी त्याला साधनेमुळे बळ मिळते.
४. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने अतिसंवेदनशीलता न्यून होऊन मनाविरुद्ध घडणार्या प्रसंगांना तोंड देता येणे शक्य होणे
सनातन संस्थेमध्ये गुरुकृपायोगानुसार व्यष्टी साधना करायला सांगतांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया, नामजप, भावजागृतीचे प्रयत्न इत्यादी करण्यास सांगितले जाते. यांचा उपयोग साधकाचे आत्मबळ वाढण्यासाठी होतो. स्वभावदोष आणि अहं न्यून झाल्याने साधकाची अतिसंवेदनशीलता न्यून होऊन तो मनाविरुद्ध घडणार्या प्रसंगांना तोंड देऊ शकतो. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेमुळे अंतर्मुखता निर्माण होऊन बाह्य परिस्थितीचा स्वतःवर परिणाम करून न घेता आनंदप्राप्तीकडे वाटचाल करता येते. सनातन संस्थेचे अनेक साधक याची अनुभूती घेत आहेत.
सद्यःस्थितीत समाजस्वास्थ्य निरोगी रहाण्यासाठी साधना, म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. त्यामुळे समाजातील कलह नष्ट होण्यास साहाय्य होईल आणि सर्वांना आनंदाने जीवन व्यतीत करता येईल. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया साधनेच्या अंतर्गत राबवण्यास शिकवून मनुष्यासाठी नित्य आनंदाचे द्वार उघडून दिले आहे. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘निरोगी मानसिक जीवन जगता येण्यासाठी मनुष्याला स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची बुद्धी होवो’, ही गुरुचरणी प्रार्थना !’
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१०.२०२३)