‘अनेक गुरूंनी आतापर्यंत त्यांच्या शिष्यांना गुरुमंत्र दिले आहेत. गुरु शिष्याची आध्यात्मिक उन्नती शीघ्र होण्यासाठी आणि त्याला सर्व संकटांतून तारण्यासाठी गुरुमंत्राच्या माध्यमातून स्वतःची शक्तीच प्रदान करतात. गुरुमंत्रामागे गुरूंचा संकल्प असल्यामुळे तो जप केल्यामुळे शिष्याची उन्नती शीघ्र होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी १४.५.२०२१ या दिवशी साधकांना ‘निर्विचार’ हा नामजप करण्यास सांगितले. श्रीविष्णुस्वरूप असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांसारख्या अत्युच्च आध्यात्मिक पातळीच्या गुरूंनी उच्चारलेले एखादे वाक्य ज्याप्रमाणे ब्रह्मवाक्य ठरते, त्याचप्रमाणे त्यांनी करायला सांगितलेला नामजप हा एकप्रकारे गुरुमंत्रच ठरतो ! याचे कारण म्हणजे, ‘या नामजपामुळे साधकांचे मन निर्विचार, म्हणजे एकप्रकारे नष्ट होऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती लवकर व्हावी’ हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा उद्देश असून यामागे त्यांचा अव्यक्त संकल्पही कार्यरत झाला आहे. यामुळे साधकांनी हा नामजप करतांना या जपामागे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची संकल्पशक्ती कार्यरत होणारच आहे. या दृष्टीने हा एकप्रकारे समष्टी गुरुमंत्रच झाला आहे.
‘निर्विचार’ हा नामजप करण्यास आरंभ केल्यानंतर मनातील विचार पुष्कळ अल्प होणे, मन स्थिर होणे यांसारख्या अनुभूती आतापर्यंत अनेक साधकांना आल्या आहेत. इतकेच नव्हे, तर समाजातील राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनाही या नामजपाचे लाभ होत आहेत.
एकदा एका सत्संगात मी काही साधकांसह उपस्थित होतो. आम्ही सर्व जण सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या आगमनाची प्रतीक्षा करत होतो. ते येण्याच्या काही वेळ अगोदर माझा ‘निर्विचार’ हा नामजप आपोआप चालू झाला. यावरून या नामजपात सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची स्पंदने असल्याचे लक्षात आले. थोडक्यात ‘या नामजपासह त्यांची शक्ती, म्हणजे ते आपल्या सोबत सूक्ष्मातून असणारच आहेत’ हा भाव वाढण्यास साहाय्य झाले. ‘हा गुरुमंत्रच आहे, असा भाव ठेवून मी हा नामजप करण्यास आरंभ केल्यानंतर हा जप सहजतेने, मनापासून, आतून आणि गुरुस्मरणासह होतो’, असेही मला जाणवले. साधकांनीही अशा प्रकारे भाव ठेवून हा नामजप केल्यास त्यांनाही या नामजपाचे फळ निश्चितच अधिक मिळेल.
(टीप : आध्यात्मिक त्रास असणार्यांनी ‘त्रास अल्प करणे’ हे सध्या त्यांच्या दृष्टीने प्राधान्याचे असल्याने त्यांनी त्रासनिवारणासाठी आवश्यक ते नामजप करावेत.)’
– पू. संदीप आळशी (२५.९.२०२३)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |