जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्‍या धर्माभिमानी कुलगुरु शांतीश्री पंडित !

कुलगुरु शांतीश्री पंडित

१. जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्‍या कुलगुरु शांतीश्री पंडित यांचा राष्‍ट्र आणि धर्म यांविषयीचा अभिमान

‘१७.९.२०२३ या दिवशी देहलीच्‍या जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील (‘जे.एन्.यू.’तील) एका कार्यक्रमात कुलगुरु शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी काही महत्त्वाचे सूत्र उपस्‍थित केली. या वेळी त्‍यांनी विद्यापिठातील काही विचित्र आणि आश्‍चर्यकारक गोष्‍टींविषयी भाष्‍य केले. त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘मी फेब्रुवारी २०२२ पासून येथील कुलगुरु म्‍हणून कार्यरत आहे. मी येण्‍यापूर्वी या विद्यापिठात ना भारताचा तिरंगा लावला होता, ना फडकावला होता. तसेच राष्‍ट्रपती किंवा पंतप्रधान यांची छायाचित्रे विद्यापिठाच्‍या कार्यालयात कुठेही नव्‍हती.’’ त्‍यांनी विद्यापिठाची सूत्रे हाती घेतल्‍यानंतर सर्वप्रथम तिरंगा झेंडा बसवला, तसेच राष्‍ट्रपती आणि पंतप्रधान यांची छायाचित्रे लावली. अर्थात्‌च, याला काही भारतद्वेषी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी विरोध केला. हा विरोध कुलगुरु पंडित यांनी धुडकावून लावला.

त्‍या विद्यार्थ्‍यांना उद्देशून म्‍हणाल्‍या, ‘‘तुम्‍हाला येथे फुकट रहायला आणि जेवायला मिळते. हा सर्व भार करदाते उचलतात आणि म्‍हणून तुम्‍ही त्‍यांच्‍या प्रती कायम ऋणी अन् कृतज्ञताभावात रहा.’’ त्‍या पुढे म्‍हणाल्‍या, ‘‘मी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाची बालसेविका आहे आणि मला संघाकडून संस्‍कार मिळाले आहेत. त्‍यामुळे मी त्‍यांच्‍या प्रती कृतज्ञ आहे. मला मी हिंदु असल्‍याविषयी पुष्‍कळ अभिमान आहे; म्‍हणून मी गर्वाने म्‍हणते की, ‘मी हिंदु आहे !’’ या विधानानंतर उपस्‍थित राष्‍ट्राभिमानी विद्यार्थ्‍यांनी उत्‍स्‍फूर्तपणे ‘जय श्रीराम’च्‍या घोषणा दिल्‍या. कुलगुरु पुढे म्‍हणाल्‍या, ‘‘राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ आणि साम्‍यवादी (कम्‍युनिस्‍ट) या दोन भिन्‍न विचारसरणी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान निवडीनंतर ते संपूर्ण देशाच्‍या हितासाठी कार्यरत असतात. त्‍यामुळे ते कोणत्‍या पक्षाच्‍या तिकिटावर निवडून आले, याला महत्त्व नसते. त्‍यामुळे देशाचे प्रमुख म्‍हणून त्‍यांचा सन्‍मान व्‍हायला पाहिजे.’’

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

२. आक्रमकांच्‍या नावाने असलेली गावांची नावे पालटण्‍याविषयी कुलगुरु पंडित यांची भूमिका

नालंदा विद्यापिठाचा कायापालट झाल्‍याविषयी त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘ज्‍या विद्यापिठाचा विध्‍वंस बख्‍तियार नावाच्‍या क्रूर धर्मांधाने केला, त्‍याचेच नाव अद्यापही एका जिल्‍ह्याला आहे. ही विचित्र गोष्‍ट आहे. त्‍यामुळे ते पालटणे आवश्‍यक आहे.’’ (नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ, काशी विद्यापीठ हे सर्व जगभरात लोकप्रिय होते. तेथे जगभरातील विद्यार्थी शिकायला येत होते. त्‍यामुळे भारत सर्वार्थाने विश्‍वगुरु होता.)

३. तिस्‍ता सेटलवाड यांना सर्वोच्‍च न्‍यायालयाने विशेष वागणूक दिल्‍याविषयी कुलगुरूंची अप्रसन्‍नता

कुलगुरु शांतीश्री पंडित या एका अतिशय महत्त्वाच्‍या विषयावर बोलल्‍या. त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘सर्वोच्‍च न्‍यायालयाने उन्‍हाळी सुट्टी असतांना आणि तेही रात्री ९ वाजता तिस्‍ता सेटलवाड हिला जामीन देण्‍यासाठी सुनावणी घेतली. त्‍यासारखी वागणूक मला मिळेल का ? किंवा जनसामान्‍यांना मिळेल का ?’’ सर्वप्रथम तिस्‍ता यांचे हे प्रकरण न्‍यायमूर्ती ओक आणि न्‍यायमूर्ती मिश्रा यांच्‍या द्विसदस्‍यीय पिठासमोर ठेवण्‍यात आले होते. त्‍यांनी हे प्रकरण ऐकण्‍यास असमर्थता व्‍यक्‍त केली आणि ते दुसर्‍या पिठाकडे पाठवावे, असे सांगितले. त्‍यानंतर सरन्‍यायाधीश स्‍वतः एका कार्यक्रमात व्‍यस्‍त असतांना हे प्रकरण ऐकण्‍यासाठी अचानक विशेष खंडपीठ स्‍थापन झाले. त्‍यांनी हे प्रकरण गवई, बोपन्‍ना आणि दीपंकर दत्ता या

३ न्‍यायमूर्तींसमोर ठेवले अन् तिस्‍ता सेटलवाड यांना जामीन मिळाला. वर्ष २००२ च्‍या गोध्रा हत्‍याकांड प्रकरणी तिस्‍ता यांनी बनावट (खोटी) कागदपत्रे सिद्ध करून निरपराध आणि पापभिरु लोकांना आरोपी करण्‍याचा प्रयत्न केला. त्‍यामुळे त्‍यांना गुजरात उच्‍च न्‍यायालयाने जामीन नाकारला होता. याविषयी सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या ३ सदस्‍यीय पिठाने स्‍पष्‍ट निकालपत्र दिले आहे.

४. सर्वोच्‍च न्‍यायालयाने त्‍यांचे ‘यतो धर्मस्‍ततो जयः ।’ हे ब्रीदवाक्‍य पाळावे !

सर्वोच्‍च न्‍यायालय हे तिस्‍ता सेटलवाड किंवा मुंबई बाँबस्‍फोटातील आरोपी यांच्‍यासाठी रात्री-अपरात्री न्‍यायालय उघडते आणि सुनावणी घेते. याविषयी अनेक लोकांनी वेळोवेळी नापसंती व्‍यक्‍त केली आहे. त्‍यामुळे कुलगुरू पंडित यांनी उपस्‍थित केलेले हे सूत्र अतिशय योग्‍य आहे. तसेच कधीतरी न्‍यायव्‍यवस्‍थेसमोर हा विषय चर्चेला येणे आवश्‍यक आहे. ‘न्‍यायव्‍यवस्‍था केवळ वलयांंकित लोकांसाठी कार्य करते’, असा भारत देशातील १३० कोटी जनतेचा अपसमज होऊ नये. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे ‘यतो धर्मस्‍ततो जयः ।’, म्‍हणजे ‘जिथे धर्म (न्‍याय) आहे तिथे विजय निश्‍चित आहे’, हे ब्रीदवाक्‍य आहे आणि ते खर्‍या अर्थाने पाळले गेले पाहिजे.’

श्रीकृष्‍णार्पणमस्‍तु !

– (पू.) अधिवक्‍ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्‍च न्‍यायालय (१९.९.२०२३)