देव ‘फॅशन’साठी नको !

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

‘आई कुठे काय करते’ या मराठी मालिकेमध्‍ये भूमिका साकारणार्‍या अभिनेत्री अश्‍विनी महांगडे यांनी गणेशोत्‍सवानिमित्त केलेल्‍या एका पेहरावामुळे त्‍यांच्‍या एका चाहतीने नापसंती व्‍यक्‍त केली आहे. त्‍यामध्‍ये अश्‍विनी महांगडे या जरीची साडी नेसून गणपतीची पूजा करतांना दिसत आहेत; मात्र त्‍या साडीवर घातलेल्‍या ‘ब्‍लाऊज’च्‍या पाठीमागे खड्यांनी गणपतीचा आकार काढलेला आहे. ते पाहून ‘पाठीवर, पदरावर गणपती नसावा, असे मला मनापासून वाटते’, अशी ‘कमेंट’ (अभिप्राय देत) करत एका चाहतीने तिची नापसंती व्‍यक्‍त केली आहे. विशेष कौतुकाचे, म्‍हणजे अभिनेत्री अश्‍विनी महांगडे यांनी ‘पुढच्‍या वेळी काळजी घेऊ’, असे सकारात्‍मक उत्तर दिले आहे. अश्‍विनी महांगडे यांच्‍या ‘फेसबुक’ खात्‍यावर ही पोस्‍ट प्रसारित होत आहे. पुण्‍यातील मानाच्‍या गणपतींची आरती करतांना अभिनेत्रीने असा पेहराव केला होता. श्री गणेशाच्‍या दर्शनासाठी तिथे लाखो भाविक उपस्‍थित होते. कुणालाही या पोशाखाविषयी काहीच वावगे वाटले नाही, हे दुर्दैव आहे.

कोणत्‍याही देवतेची जागा देव्‍हार्‍यात किंवा मंदिरातच असते. असे कुठेही आपण त्‍या देवतेला ठेवू शकत नाही आणि जर ठेवले, तर त्‍यामुळे त्‍या देवतेचे पावित्र्य नष्‍ट होते, त्‍या देवतेचा अवमान होतो. धर्मशिक्षण दिले गेले नसल्‍याने धर्मातील ही तत्त्वे समाजात ठाऊक नाहीत, अशी स्‍थिती येते. देवतेवर श्रद्धा असते; परंतु धर्मातील ही तत्त्वे ठाऊक नसल्‍यामुळे त्‍यांच्‍याकडूनही नकळत देवतेचा अवमान होतो. ‘शब्‍द, स्‍पर्श, रूप, रस, गंध आणि त्‍यांच्‍याशी संबंधित शक्‍ती एकत्र असतात’, या सिद्धांतानुसार त्‍या त्‍या संबंधित चित्रांच्‍या माध्‍यमातून त्‍या त्‍या देवतेचे तत्त्व तेथे आकर्षित झालेले असते. ‘फॅशन’ (नवरूढी) करण्‍यासाठी ‘आपण हिंदूंच्‍या श्रद्धेला पायदळी तुडवत आहोत’, याची जाणीव हे कलाकार किंवा संबंधित यांना नसते. कुणीही देवतांच्‍या आकाराचा कुठल्‍याही ठिकाणी वापर करण्‍यापूर्वी नीट विचार करणे आवश्‍यक आहे. जिथे आपण देवतेचे पूजन करू शकत नाही, तिथे तिचे अस्‍तित्‍व साकारणे अयोग्‍य आहे. त्‍यामुळे देवतेचा अनादर होतो, हे लक्षात घेतले पाहिजे ! भावी पिढी अशा प्रकारच्‍या कृतीने कोणता आदर्श घेणार ? याची जाण कलाकारांनी ठेवणे आवश्‍यक आहे. अभिनेत्रींचे अनुकरण करणारे कित्‍येक जण असतात. त्‍यामुळे त्‍यांनी अशा गोष्‍टींचे भान ठेवणे आवश्‍यक आहे.

– सौ. अपर्णा जगताप, पुणे