मुंबईत राजकीय पक्षांकडून काहीना काही निमित्त करून नाक्यानाक्यावर होर्डिंग्ज किंवा फलक लावले जातात. एकीकडे महानगरपालिका मुंबईचे सौंदर्य वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे, तर दुसरीकडे रस्त्यांवर होर्डिंग्ज लावून मुंबई बकाल करण्यासाठी जणू राजकीय पक्षांत चढाओढ लागली आहे ! मुंबई विद्रूप करणार्या राजकीय ‘बॅनरबाजी’वर थेट उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. विज्ञापनांच्या फलकांविषयी धोरण आखण्याचे आदेशही महानगरपालिकेला दिले आहेत; परंतु तरीही गणेशोत्सवात संपूर्ण मुंबईत ठिकठिकाणी राजकीय पक्षांचे होर्डिंग्ज, कमानी लावण्यात आल्या होत्या. गणेशचतुर्थीच्या निमित्ताने ज्या मार्गावरून श्री गणेशमूर्ती मंडळांत नेल्या जातात, त्या मार्गांवर श्री गणेशभक्तांच्या स्वागताचे फलक झळकले होते. दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्ती गणेशचतुर्थीच्या दुसर्या दिवशी विसर्जित होतात. त्यामुळे ज्या ठिकाणी बाप्पाच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते, त्याच ठिकाणी बाप्पाला निरोप देणारे फलक एका रात्रीत पालटण्यात आले ! यंदा लहानात लहान मंडळांनाही कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय पक्षाने कमानी पुरवल्या होत्या. या कमानी उभारण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा खड्डे खोदण्यात आले होते. परिणामी रस्त्यावरून ये-जा करणार्या वाहनांना कसरत करावी लागत होती.
राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण पहाता प्रत्येक पक्ष आपले मोठेपण सिद्ध करण्यासाठी आटापिटा करत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी झळकलेले राजकीय फलक आणि कमानी यांमध्ये सर्वच पक्षच अग्रस्थानी दिसत आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्व पक्षांनीच हरताळ फासल्याचे चित्र दिसत होते ! दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील कांदिवली परिसरात मोठ्या प्रमाणात फलक लावण्यात आले होते. महापालिकेचे पथक तिथे कारवाईसाठी गेले असता फलक लावणार्याने पालिका कर्मचार्यांनाच पुष्कळ मारहाण केली. त्यामुळे या ‘राजकीय फलकांवर कारवाई करायची तरी कशी ?’, असा प्रश्न महापालिका अधिकार्यांना पडला आहे. गणेशोत्सव झाल्याने आता हे फलक काढलेही जातील; पण लगेच नवरात्र आणि नंतर दिवाळी येईल आणि हे फलक पालटत रहातील ! न्यायालयाच्या आदेशांचे काटकोरपणे पालन होण्याच्या दृष्टीने प्रशासकीय अधिकार्यांना योग्य ते संरक्षण पुरवणे सरकारचे काम आहे. असे असतांना राजकीय पक्षच न्यायालयाचा आदेश जुमानत नसतील, तर प्रशासकीय अधिकार्यांनी कारवाई तरी कुणावर करायची ?
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.