‘हिंदु धर्मामध्ये मृत पितरांना पुढची गती मिळावी, यासाठी श्राद्धविधी करण्यास सांगितला आहे. श्राद्ध न केल्यास कोणते दोष संभवतात, याचेही वर्णन विविध धर्मग्रंथांत आले आहे.
१. स्कंद पुराण
‘मृत तिथीच्या श्राद्धाव्यतिरिक्त कितीही मौल्यवान पदार्थ असले, तरी पितर ते ग्रहण करू शकत नाहीत. विनामंत्राने दिलेले अन्नोदक पितरांना मिळत नाही.’ (संदर्भ : स्कंद पुराण, माहेश्वरी खंड, कुमारिका खंड, अध्याय ३५/३६)
२. ऋग्वेद
त्वमग्न ईळितो जातवेदोऽवाड्ढव्यानि सुरभीणि कृत्वी ।
प्रादाः पितृभ्यः स्वधया ते अक्षन्नद्धि त्वं देव प्रयता हवींषि ॥
– ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त १५, ऋचा १२
अर्थ : हे सर्वज्ञ अग्निदेवा, आम्ही तुझी स्तुती करतो. तू आम्ही दिलेले हे हवनीय द्रव्य सुगंधित करून आमच्या पितरांना पोचव. आमचे पितर स्वधा म्हणून दिलेल्या हवनीय द्रव्याचे भक्षण करोत. हे देवा, तूसुद्धा आम्ही प्रयत्नपूर्वक अर्पण केलेल्या या हविर्भागाचे भक्षण कर.
३. कूर्मपुराण
अमावास्यादिने प्राप्ते गृहद्वारं समाश्रिताः ।
वायुभूताः प्रपश्यन्ति श्राद्धं वै पितरो नृणाम् ॥
यावदस्तमयं भानोः क्षुत्पिपासासमाकुलाः ।
ततश्चास्तङ्गते भानौ निराशादुःखसंयुताः ॥
निःश्वस्य सुचिरं यान्ति गर्हयन्तः स्ववंशजम् ।
जलेनाऽपि च न श्राद्धं शाकेनापि करोति यः ॥
अमायां पितरस्तस्य शापं दत्वा प्रयान्ति च ॥ – कूर्मपुराण
अर्थ : (मृत होऊन) वायूरूप झालेले पितर अमावास्येच्या दिवशी आपल्या वंशजांच्या घरी येऊन आपल्याला श्राद्ध वाढले जात आहे का ? हेे पहातात. सूर्य मावळेपर्यंत तहान-भुकेने (अतृप्त वासनांमुळे) व्याकुळ झालेले पितर श्राद्ध न मिळाल्याने सूर्यास्त झाल्यावर निराश होतात आणि दुःखी निःश्वास टाकून स्वतःच्या वंशजांना चिरकाल दोष देतात. अशा वेळी जो पाण्याने अथवा भाजीनेही श्राद्ध वाढत नाही, त्याला अमावास्येच्या दिवशी त्याचे पितर शाप देऊन निघून जातात.
४. आदित्यपुराण
न सन्ति पितरश्चेति कृत्वा मनसि वर्तते ।
श्राद्धं न कुरुते यस्तु तस्य रक्तं पिबन्ति ते ॥ – आदित्यपुराण
अर्थ : मेल्यावर पितरांचे अस्तित्व नसते, असा विचार करून जो श्राद्ध करत नाही, त्याचे रक्त त्याचे पितर पितात.
५. मार्कण्डेयपुराण
श्राद्ध न केल्यामुळे प्राप्त होणारे दोष
न तत्र वीरा जायन्ते नाऽऽरोग्यं न शतायुषः ।
न च श्रेयोऽधिगच्छन्ति यत्र श्राद्धं विवर्जितम् ॥ – मार्कण्डेयपुराण
अर्थ : जेथे श्राद्ध केले जात नाही, त्या घरी मुलगा (वीराः) होत नाही (झाल्या, तर सर्व मुलीच होतात), तेथील लोकांना आरोग्य लाभत नाही. तेथील लोकांचे आयुष्य न्यून होते (न शतायुषः), त्यांना अर्थिक अडचणी संभवतात अथवा समाधान लाभत नाही (न च श्रेयः). (संदर्भ : श्राद्धकल्पलता, पृष्ठ ६)
या संदर्भांवरून श्राद्धादी कर्मे न केल्यास पितर रुष्ट होतात आणि त्यांच्या वंशजांना त्रास होतो, हे लक्षात येते. सर्व भौतिक प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा असे त्रास दूर होत नाहीत, त्या वेळी असे त्रास पूर्वजांमुळे होतात, असे अनुमान करता येते.
(साभार : ग्रंथाचे नाव : भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन, लेखक : योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर, प्रकाशक : आदित्य प्रतिष्ठान, पुणे.)