श्राद्ध करण्‍याचे महत्त्व

१. श्राद्धासाठी तिथी

‘संन्‍यासी पितरांसाठी एकादशी, तसेच शस्‍त्रास्‍त्राने ज्‍यांचा मृत्‍यू आला असेल (अपघात, भूकंप, पाऊस, बाँबस्‍फोट, खून इत्‍यादी कारणाने मृत्‍यू आलेल्‍यांसाठी), त्‍यांच्‍यासाठी चतुर्दशी अशा तिथी सांगितल्‍या आहेत. या चतुर्दशीला ‘घायाळ चतुर्दशी’ म्‍हणतात.’

२. श्राद्धास योग्‍य तिथी

सर्वांत श्रेष्‍ठ आणि उत्तम श्राद्ध हे श्राद्धपक्षातील तिथींना होते. आपले पूर्वज ज्‍या तिथीला या जगातून गेले आहेत, त्‍याच तिथीला श्राद्धपक्षात केले जाणारे श्राद्ध सर्वश्रेष्‍ठ असते. ज्‍यांची दिवंगत झाल्‍याची तिथी लक्षात नसेल, त्‍यांच्‍या श्राद्धासाठी अमावास्‍येची तिथी उपयुक्‍त मानावी. रात्रीच्‍या वेळी श्राद्धकर्म निषिद्ध आहे. काशी, गया, प्रयाग, रामेश्‍वर इत्‍यादी क्षेत्रस्‍थानी केलेले श्राद्ध विशेष फलदायी असते.

३. श्राद्धामध्‍ये पिंडदान

लहान मुले आणि संन्‍याशी यांच्‍यासाठी पिंडदान केले जात नाही; कारण शरिरात त्‍यांची आसक्‍ती नसते. पिंडदान त्‍यांच्‍याचसाठी असते, ज्‍यांना ‘मी, माझे’ची आसक्‍ती असते.’

४. श्राद्धाच्‍या दिवशी करावयाचे पठण

श्राद्धात ३ गोष्‍टी लक्षात ठेवाव्‍यात, ‘शुद्धी, अक्रोध आणि अत्‍वरा म्‍हणजे घाई गडबड नको.’ श्राद्धाच्‍या दिवशी ‘भगवद़्‍गीते’मधील ७ व्‍या अध्‍यायाचे पठण करावे किंवा जमेल तितकी ‘ज्ञानेश्‍वरी’ वाचावी. या अमृतमय पितरांना मुक्‍त करण्‍यास तीर्थ, दान, तप आणि यज्ञसुद्धा सर्वथा समर्थ नाहीत. केवळ गीतेचा ७ वा अध्‍यायच प्राण्‍यांची जरा-मृत्‍यू इत्‍यादी दूर करणारा आहे.

५. श्राद्धात श्रद्धा ठेवल्‍याचे लाभ

श्राद्ध कर्मामध्‍ये दिले गेलेले पदार्थ मंत्र तेथे पोचवतो, जेथे लक्षित जीव उपस्‍थित रहातो. श्राद्धामध्‍ये दिलेले अन्‍न पितरांची नावे, गोत्र आणि मंत्र हे त्‍यांच्‍यापर्यंत घेऊन जातात, मग ते शेकडो योनींमध्‍ये का गेलेले असेनात. श्राद्धाचे अन्‍न आदी पदार्थांमुळे त्‍यांची तृप्‍ती होते.

६. आई-वडिलांना तृप्‍त केले नाही, तर त्‍यांच्‍या पोटी दुःख देणारी मुले जन्‍माला येणे

एखाद्याच्‍या घरी लुळी-पांगळी किंवा आई-वडिलांना दुःख देणारी मुले जन्‍माला आली, तर त्‍याचे कारणही असेच असते. ज्‍यांनी पितरांना तृप्‍त केले नाही आणि त्‍यांची पूजा केली नाही, आपल्‍या आई-वडिलांना तृप्‍त केले नाही, त्‍यांची मुलेसुद्धा त्‍यांना तृप्‍त करणारी होत नाहीत.

श्राद्धाचा एक विशेष लाभ असा आहे की, मृत्‍यूनंतरही जिवाचे अस्‍तित्‍व रहाते. या गोष्‍टीची आठवण टिकून रहाते.

७. गरुड पुराणात श्राद्धमहिमा

अमावास्‍येच्‍या दिवशी पितृगण वायूरूपात घराच्‍या दारासमीप उपस्‍थित रहातात आणि आपल्‍या आप्‍तेष्‍टांकडून श्राद्धाची इच्‍छा करतात. जोपर्यंत सूर्यास्‍त होत नाही, तोपर्यंत ते तहान-भुकेने व्‍याकूळ होऊन तेथेच उभे रहातात. सूर्यास्‍त झाल्‍यानंतर आपापल्‍या लोकी निघून जातात; म्‍हणून अमावास्‍येच्‍या दिवशी प्रयत्नपूर्वक श्राद्ध अवश्‍य केले पाहिजे.

८. पितृकार्याला विशेष महत्त्व

कुर्वीत समये श्राद्धं कुले कश्‍चिन्‍न सीदति ।
आयुः पुत्रान् यशः स्‍वर्गं कीर्तिं पुष्‍टिं बलं श्रियम् ॥

पशून् सौख्‍यं धनं धान्‍यं प्राप्‍नुयात् पितृपूजनात् ।
देवकार्यादपि सदा पितृकार्यं विशिष्‍यते ।
देवताभ्‍यः पितृणां हि पूर्वमाप्‍यायनं शुभम् ॥ – स्‍मृतिचन्‍द़्रिका

अर्थ : नेहमी वेळच्‍या वेळी श्राद्ध करावे. तसे केल्‍याने कुळात कुणी दुःखी रहात नाही. पितरांची पूजा करून मनुष्‍य आयुष्‍य, पुत्र, यश, स्‍वर्ग, कीर्ती, पुष्‍टी, बल, ऐश्‍वर्य, पशूधन, सुख आणि धनधान्‍य प्राप्‍त करतो. देवकार्यापेक्षाही पितृकार्याला विशेष महत्त्व आहे. देवतांच्‍या आधी पितरांना महत्त्व आहे. पितरांना प्रसन्‍न करणे अधिक कल्‍याणकारी आहे; म्‍हणून सर्व विधीत पितरांचीही पूजा केली जाते.

– ज्‍योतिषी ब.वि. तथा चिंतामणी देशपांडे (गुरुजी)

(साभार : मासिक ‘धनुर्धारी’, सप्‍टेंबर २०१०)