ऑगस्ट २०२३ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांकडून सूक्ष्मातील एक प्रयोग करून घेण्यात आला. त्या वेळी साधकांना एक पाकीट देण्यात आले. त्यानंतर त्यांना ‘ते पाकीट नमस्काराच्या मुद्रेतील हातांमध्ये (हात अनाहतचक्रापाशी नेऊन) २ मिनिटे धरून काय जाणवते ?’, हे अभ्यासायला सांगितले. नंतर त्यांना दुसरे एक पाकीट देऊन ‘तेही वरीलप्रमाणे नमस्काराच्या मुद्रेत २ मिनिटे धरून काय जाणवते ?’, हे अभ्यासायला सांगितले. या प्रयोगाचे विश्लेषण पुढे दिले आहे.
१. प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांची संख्या
१ अ. एकूण साधक : २४२
१ आ. आध्यात्मिक त्रास नसलेले साधक : २१४
१ इ. आध्यात्मिक त्रास असलेले साधक : २८
२. आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि असलेल्या साधकांवर प्रयोगाचा झालेला परिणाम
पाकीट क्र. २ हातांत धरल्यावर साधकांना ‘मन अस्थिर होणे, डोके दुखणे, दाब जाणवणे’, अशा त्रासदायक अनुभूती आणि ‘नामजप आपोआप चालू होणे, गारवा जाणवणे, शांत अन् स्थिर वाटणे, हलकेपणा जाणवणे’, अशा चांगल्या अनुभूती आल्या.
३. पाकीट क्र. २ हातांत धरल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती
३ अ. त्रासदायक अनुभूती
१. ‘पाकीट हातांत धरल्यावर माझे मन अस्थिर झाले. माझ्या श्वासोच्छ्वासाची गती वाढली. मी पाकीट अधिक वेळ हातांत धरू शकले नाही.’ – एक साधिका
२. ‘पाकीट हातांत घेतल्यावर माझे डोके दुखू लागले. माझा नामजप बंद पडला आणि माझे मन अस्वस्थ झाले.’ – दुसरी साधिका
३. ‘आरंभी ‘पाकीट हातांत घेऊ नये’, असे मला वाटले. पाकीट हातात घेतल्यावर माझे हात बधीर झाले.’ – तिसरी साधिका
४. ‘पाकीट हातांत घेतल्यावर माझ्या तळहातांना उष्णता जाणवली. माझे डोके जड झाले आणि ते थोडे दुखू लागले. मला माझ्या अनाहतचक्रावर दाब जाणवला. माझ्या तळहातांना मुंग्या आल्यासारखे झाले आणि ‘माझ्या हातातील प्राणशक्ती पाकिटात खेचली जात आहे’, असे मला वाटले. त्या वेळी मला थकवा आणि गुंगी आल्यासारखे वाटले. – चौथी साधिका
३ आ. वैशिष्ट्यपूर्ण चांगल्या अनुभूती
३ आ १. ६१ टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या साधिकांना आलेल्या अनुभूती
अ. ‘निळ्या आणि केशरी रंगाचे कण सर्वत्र पसरत आहेत’, असे मला जाणवले. ‘पाकीट हातातच ठेवावे’, असे मला वाटत होते.’ – सुश्री (कु.) कविता राठीवडेकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४४ वर्षे)
आ. ‘माझी भावजागृती झाली आणि ध्यान लागले.’ – सुश्री (कु.) भाविनी कापडिया (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४१ वर्षे)
इ. ‘मला माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवली. मला परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण झाले.’ – सुश्री (कु.) राजश्री मामलेदार (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ५५ वर्षे)
ई. ‘माझा श्वासोच्छ्वास एका लयीत होऊ लागला.’ – सौ. भक्ती खंडेपारकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४४ वर्षे)
उ. ‘प्रथम मला आनंद जाणवला आणि नंतर माझ्या अंगावर शहारे आले.’ – कु. हर्षदा दातेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३९ वर्षे)
ऊ. ‘माझे मन शांत होऊन नामजप एका लयीत होऊ लागला.’ – सुश्री (कु.) कीर्ती आमाती (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४१ वर्षे)
ए. ‘मला उपाय झाल्यासारखे वाटले.’ – सौ. सुषमा नाईक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४३ वर्षे)
३ आ २. इतर साधकांना आलेल्या अनुभूती
अ. ‘माझा ‘श्री गुरवे नमः ।’, हा नामजप चालू झाला.’ – सौ. पल्लवी अमोल हंबर्डे
आ. ‘मला माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी गारवा जाणवला आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हसरा तोंडवळा दिसला.’ – सुश्री (कु.) दीपाली होनप
इ. ‘पाकीट हातांत घेतल्यावर माझ्या उजव्या हातातून पांढरा प्रकाश शरिरात जात असल्याचे मला जाणवले.’ – सौ. सुचेता नाईक
ई. ‘मला हलके वाटले. माझा नामजप संथपणे चालू झाला आणि मला निळसर प्रकाश दिसला.’ – सौ. अनघा पाध्ये
उ. ‘माझा ‘निर्गुण’ हा नामजप चालू झाला. ‘पाकिटात एखाद्या संतांचे छायाचित्र आहे’, असे मला वाटले. मला पांढरा रंग दिसला.’ – श्री. अमोल बधाले
ऊ. ‘मला आनंद जाणवला.’ – श्री. सागर निंबाळकर
ए. ‘मला माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी चांगले वाटत होते.’ – सौ. श्रेया रेशक गावकर
ऐ. ‘मला ध्यान लागल्यासारखे वाटले.’ – सौ. ऋतुजा नाटे
ओ. ‘मला हनुमंताची आठवण आली.’ – कु. स्मितल भुजले
औ. ‘मला पाकिटातून निर्गुण स्तराची स्पंदने येत असल्याचे जाणवले.’ – सौ. गौरी कुलकर्णी
अं. ‘मला माझ्या भोवतालचे अनिष्ट शक्तीचे आवरण न्यून होत असल्याचे जाणवले.’ – श्री. वैभव आफळे
क. ‘माझे लक्ष श्वासावर केंद्रित होत होते.’ – श्री. संदीप शिंदे
ख. ‘पाकीट हातांत घेतल्यावर चांगल्या संवेदना माझ्या तळहातांत जात असल्याचे मला जाणवले.’ – आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. कस्तुरी भोसले
ग. ‘मला पाकिटात जिवंतपणा जाणवला.’ – कु. मैथिली जोशी
घ. ‘मला चंदनाचा सुगंध आला.’ – कु. कविता निकम
च. ‘मला ‘पाकिटातून पिवळा प्रकाश बाहेर पडत आहे’, असे वाटले.’ – सौ. प्रचीती सुतार
पाकीट क्र. २ हातांत घेतल्यावर संतांना आलेल्या चांगल्या अनुभूती१. ‘पाकीट हातांत घेतल्यावर मला तेजतत्त्व जाणवले.’ – पू. (सौ.) शैलजा परांजपे (सनातनच्या ९० व्या संत, वय ७५ वर्षे) २. ‘मला शांत वाटले.’ – पू. सदाशिव परांजपे (सनातनचे ८९ वे संत, वय ८० वर्षे) ३. ‘पाकीट हातांत घेतल्यावर काही क्षणांत माझे मन शांत आणि निर्विचार झाले, तसेच मला गारवा जाणवला.’ |
४. प्रयोगाचे उत्तर
पाकीट क्र. १ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले लिखाणासाठी वापरत असलेला कोरा कागद होता आणि पाकीट क्र. २ मध्ये परात्पर डॉक्टरांनी लिखाण केलेला कागद होता. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लिखाणातील चैतन्यामुळे पाकीट क्र. २ हातांत घेतल्यावर साधकांना चांगल्या अनुभूती आल्या. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या काही साधकांना त्रास देणार्या वाईट अनिष्ट शक्तींना परात्पर गुरु डॉक्टरांच्या लिखाणातील चैतन्य सहन न झाल्याने त्यांना त्रासदायक अनुभूती आल्या.
५. निष्कर्ष
‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, या अध्यात्मातील सिद्धांताप्रमाणे व्यक्तीमधील सत्त्व, रज आणि तम या गुणांनुसार त्याच्या हस्ताक्षरातून ती ती स्पंदने प्रक्षेपित होत असतात. साधना न करणार्या व्यक्तीच्या लिखाणातून रज-तमात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात आणि त्या स्पंदनांचा परिणाम इतरांवरही होतो. साधना करणार्या साधकाची साधना जसजशी वाढत जाते, तसतशी त्याच्यातील सात्त्विकता आणि चैतन्य वाढत जाते. त्यामुळे त्या साधकाने केलेल्या लिखाणातून सात्त्विक आणि चैतन्यदायी स्पंदने प्रक्षेपित होतात अन् त्यांचा सकारात्मक परिणाम इतरांवरही होतो. महर्षींनी सांगितल्यानुसार परात्पर गुरु डॉक्टर हे श्रीविष्णूचे अवतार असल्याने त्यांच्या हस्ताक्षरात चैतन्य आहे. संतांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेले ग्रंथ, लिखाण यांतूनही चैतन्य प्रक्षेपित होत असते. या प्रयोगातून आपल्याला साधना करण्याचे महत्त्व लक्षात येते.
साधना वाढवून छोट्या छोट्या कृतींतूनही चैतन्य निर्माण करण्यास शिकवणार्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
|