१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन
‘भूमी चांगली कसली गेल्यावरच तेथे उत्तम पीक येते. तद्वत दुःखाने अंतर चांगले कसले गेल्यावर त्यापासून निजसुखाचे पीक येते आणि त्यावरच ती व्यक्ती असंख्य लोकांना सुखी करण्यास समर्थ होते.’
– प.पू. कलावतीआई, बेळगाव (साभार : ‘बोधामृत’, सुवचन क्र. १०)
२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन
२ अ. आयुष्यातील संकटांना धिराने सामोरे जाऊन त्यातून तावून-सुलाखून बाहेर निघणे’, हा जगण्याचा उत्तम मार्ग आहे ! : ‘समर्थ रामदासस्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात,
सदा सर्वदा प्रीति रामी धरावी ।
सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥
देहे दुःख ते सुख मानीत जावे ।
विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ॥
– मनाचे श्लोक, श्लोक १०
अर्थ : हे मना, नेहमी श्रीरामावर अखंड प्रीती करावी. सुखोपभोग टाळावा. देहाला होणार्या कष्टात सुख मानत जावे आणि नेहमी अंतरात सारासार विचार (श्रीरामाची भक्ती) भरलेला असावा.
‘आपल्या आयुष्यात प्रारब्धानुसार समोर येईल त्या चांगल्या आणि वाईट प्रसंगांना तोंड देत रहाणे’, म्हणजेच आयुष्य जगणे’, असे मला वाटते. ‘कितीही संकटे आली, तरी त्यांपासून दूर न पळता त्यांना धिराने सामोरे जाऊन त्यातून तावून-सुलाखून बाहेर निघणे’, हा जगण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
२ आ. माणसाला त्याच्या प्रत्येक कर्माचे फळ मिळते ! : समर्थ रामदासस्वामी पुढे म्हणतात,
जनीं सर्वसूखी असा कोण आहे ।
विचारे मना तूचि शोधूनि पाहे ॥
मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले ।
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥
– मनाचे श्लोक, श्लोक ११
अर्थ : अरे मना, या जगात सर्वांत सुखी कोण आहे ? तूच विचार कर आणि शोधून पहा. गेल्या अनेक जन्मांत तू जे संचित (कर्मामुळे निर्माण झालेले फळ) निर्माण केले आहेस, त्याप्रमाणे तुला या जन्मात ते भोगावे लागणार आहे.
जगात सर्वकाही आपल्या मनासारखे होत नाही. किंबहुना ८० टक्के घटना आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. त्यामुळे आपले मन नेहमी दुःखी होतेे; परंतु या घटनांकडे सकारात्मक दृष्टीने बघितले, तर आपल्या लक्षात येईल, ‘आपण या घटनांचा केवळ साक्षीदार म्हणून रहावे; कारण या घटना घडणारच असतात. त्याला आपला काहीच इलाज नसतो.’ आपल्या गेल्या जन्मींच्या पाप-पुण्याप्रमाणे या जन्मी आपल्याला फळ मिळत असते. नकळत आपण कुणाचे तरी मन दुखावत असतो, तर कुणाच्या अपेक्षा अपूर्ण ठेवतो किंवा किडा-मुंगीसारख्या अनेक कीटकांचा नाश करतो.
माणसाला त्याच्या प्रत्येक कर्माचे फळ मिळत असते; मात्र ते याच जन्मात मिळेल, असे नाही, तर पुढच्या जन्मीही ते मिळू शकते. माणसाच्या कर्मानुसार साठवलेल्या पाप-पुण्यालाच ‘संचित’, असे म्हणतात. या पाप-पुण्याचे हिशोब कुणीतरी नक्कीच ठेवत असतो आणि त्याप्रमाणे आपल्या पुढल्या जीवनात त्याची फळे आपण चाखतो. या सगळ्यांमध्ये माणसाचे ‘मन’ येते.
२ इ. जीवनातील सुख-दुःख आणि त्यांकडे पहाण्याचा दृष्टीकोन !
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।
न होता मनासारिखे दुःख मोठे ॥ – मनाचे श्लोक, श्लोक ९
अर्थ : ज्या कर्मामुळे पापाचे फळ भोगावे लागते, असे कर्म करणे व्यर्थ आहे. अशा कर्मामुळे आपल्या मनासारखे (अनुकूल) घडत नाही. त्याऐवजी पुष्कळ दुःख पदरात पडते.
२ इ १. दुःख झाल्यावर मनुष्य परिस्थितीला दोष देतो ! : काही गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत की, माणसाला दुःख होते; परंतु या दुःखाला आपण स्वतःच कारणीभूत असतो. आपल्या अशुद्ध अन् चुकीच्या वर्तनामुळे आपल्या शरिराला शारीरिक आणि मानसिक रोग जडतात; परंतु आपण परिस्थितीला दोष देऊन मोकळे होतो.
२ इ २. ‘सुख आणि दुःख यांकडे लक्ष न देता संकटांना सामोरे जाऊन आयुष्य पुढे नेणे’, यातच खरा पुरुषार्थ आहे ! : संत सांगतात, ‘सुख आणि दुःख असे काही नसते. सुख आणि दुःख या मनाच्या अल्प काळ टिकणार्या अवस्था आहेत. ‘त्यांकडे लक्ष न देता संकटांना सामोरे जाऊन आणि प्रश्नांची उकल करून त्यांची उत्तरे शोधून आपले आयुष्य पुढे नेणे’, यातच खरा पुरुषार्थ आहे. यासाठी ‘प्रेम, श्रद्धा, आपुलकी आणि दुसर्याप्रती आदर असणे’, हे गुण असणे अत्यंत आवश्यक आहे.’
२ इ ३. निजसुखाचे चांगले पीक घ्यायचे असल्यास अत्यंत कष्ट करून भूमी कसावी लागते आणि त्या भूमीविषयी अपार श्रद्धा असावी लागते ! : निजसुखाचे चांगले पीक घ्यायचे असेल, तर आपल्याला अत्यंत कष्ट करून भूमी कसावी लागते. ‘नांगरणी, पेरणी, लावणी, खुरपणी, तोडणी आणि खत घालणे’, असे अनेक प्रकार करावे लागतात. उन्हा-तान्हातून आणि पावसा-पाण्यातून त्या भूमीसाठी अपार कष्ट उपसावे लागतात. त्या भूमीला प्रेम लावावे लागते. त्यासाठी मनात अपार श्रद्धा असावी लागते. भूमीविषयी प्रेम असावे लागते; म्हणून बहिणाबाई म्हणतात,
अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर ।
आधी हाताला चटके, तेव्हां मिळते भाकर ॥
अर्थ : तापलेल्या तव्याचे चटके हाताला बसतात. त्या वेळी आपल्याला दुःख होते; परंतु भाकरी चांगली खरपूस भाजल्यावर ती खाण्यातला आनंद फार वेगळा असतो.
२ इ ४. आपल्या जीवनात सदैव चालू असलेला सुख-दुःखांचा खेळ ओळखून आपण त्याप्रमाणे वागले पाहिजे ! : दुःखात लपलेल्या सुखाला जाणण्यातच आपल्याला आपल्या यशस्वी आयुष्याची किल्ली सापडते. दुःख हे कधीही कायम रहात नाही किंवा त्यानंतर येणारे सुखही कायम रहात नाही. ‘सुख-दुःखांचा छाया-प्रकाशाचा खेळ आपल्या जीवनात सदैव चालू असतो. तो ओळखून आपण त्याप्रमाणे वागले पाहिजे’, असे प.पू. कलावतीआई सांगतात.
२ इ ५. ‘मरणांत खरोखर जग जगतें…’ (कवी भा.रा. तांबे) ही कवितेची ओळ ‘मरण आहे; म्हणून जीवनाचे मोल आहे’, हेच सत्य सांगून जाते.
२ इ ६. सोने अग्नीमध्ये भरपूर जाळावे लागते. त्यानंतरच ते उजळते.
२ इ ७. ‘चणे खावे लोखंडाचे । तेव्हा ब्रह्मपदी नाचे ॥’, म्हणजे ‘कठोर परिश्रमाअंतीच ब्रह्मपद प्राप्त होते.’
२ इ ८. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे ।’, म्हणजे ‘प्रयत्नाने असाध्य गोष्टही साध्य होऊ शकते’, असेही अनुभवाचे बोल सांगतात.
२ ई. सतत निष्काम कर्म करत रहावे ! : ‘माणसाने आपल्या निश्चित चांगल्या उद्देशासाठी सतत निष्काम कर्म करत रहाणे, हे आयुष्याचे मर्म आहे’, असे श्रीकृष्णाने भगवद़्गीतेत सांगितले आहे. ‘कर्म करत राहून त्याच्या फळाचा त्याग करणे’, याविषयी भगवान श्रीकृष्णाने गीतेत विशद केले आहे.
२ उ. निरपेक्ष वृत्तीने कर्म केल्यास सुख-दुःखाचा त्रास होणार नाही !
मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
मना सर्वथा नीति सोडू नको हो ।
मना अंतरी सार वीचार राहो ॥ – मनाचे श्लोक, श्लोक ४
अर्थ : हे मना, पापवासना काही कामाची नाही. निव्वळ पापबुद्धी मनात बाळगू नये आणि नीतीमत्ता कधीही सोडू नये. सारासार विचार नेहमी मनात असायला हवा.
‘आपण जर सारासार बुद्धी ठेवून, म्हणजेच निरपेक्ष वृत्तीने कर्म करत राहिलो, तर आपल्याला सुख आणि दुःख या दोन्हींचाही त्रास होणार नाही’, असे मला वाटते.’
– (पू.) किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे