छत्रपती संभाजीनगर येथील महिला पोलीस अधिकार्याला भाजप कार्यकर्त्याची धमकी !
छत्रपती संभाजीनगर – येथील एका भाजप कार्यकर्त्याने येथील एका महिला पोलीस अधिकार्याला धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धमकीमुळे संबंधित महिला पोलीस अधिकार्याचा रक्तदाब वाढल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या सर्व घटनेविषयी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली.
राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या एका कार्यकर्त्याने ‘आपण सावे यांचे स्वीय साहाय्यक आहोत. मी सांगत असल्याप्रमाणे माझ्या मर्जीप्रमाणे गुन्हा नोंद करावा, तसेच तुम्ही तक्रार का घेत नाही ? तुम्हाला बोलण्याची पद्धत आहे का ? मी कोण आहे, हे माहिती आहे का ? मी आमदार सावे यांचा पी.ए. (स्वीय साहाय्यक) आहे. तुमची मी साहेबाकडे तक्रार करतो’, असे म्हणत या कार्यकर्त्याने सावे यांच्या नावाचा वापर करून महिला अधिकार्यावर दबाव टाकला. ‘नांदेडकर’ असे त्याचे नाव असल्याची नोंद संबंधित महिला पोलीस अधिकार्याने स्थानिक नोंद (स्टेशन डायरी) वहीत घेतली आहे.
पोलिसांना कोणतीही शिवीगाळ झालेली नाही ! – अतुल सावे, मंत्री
याविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना मंत्री अतुल सावे म्हणाले की, संबंधित व्यक्ती माझी स्वीय साहाय्यक नसून केवळ कार्यकर्ता आहे, तसेच पोलिसांना कोणतीही शिवीगाळ झालेली नाही. उलट पोलिसांनीच आमच्या एका पदाधिकार्याला पकडून ‘तू ‘झोमॅटो’मध्ये कशाला काम करतो ? रात्री पार्सल देण्यासाठी का जातो ?’, असे म्हणत दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. त्यामुळे ‘कुणावरही खोटा गुन्हा नोंद करू नका’, असे मी पोलिसांना सांगितले आहे.