‘डीजे’च्‍या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्‍यू !

कवठेएकंद (जिल्‍हा सांगली) येथील गणेशोत्‍सव मिरवणुकीतील घटना !

प्रतिकात्मक चित्र

तासगाव (जिल्‍हा सांगली) – गणेशोत्‍सव मिरवणुकीत कवठेएकंद येथील शेखर सुखदेव पावशे या ३२ वर्षीय तरुणाचा ‘डीजे’च्‍या (मोठा आवाज करणारी ध्‍वनीक्षेपक यंत्रणा) कर्णकर्कश आवाजामुळे हृदयाचे ठोके बंद पडून २६ सप्‍टेंबरला मृत्‍यू झाला. शेखरची १० दिवसांपूर्वीच हृदयाशी संबंधित एक शस्‍त्रक्रिया झाली होती. तरीही तो विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. मिरवणूक बसस्‍थानक परिसरात आल्‍यावर त्‍याला ‘डीजे’चा आवाज सहन न झाल्‍याने अस्‍वस्‍थ वाटू लागले. यानंतर त्‍याला तासगाव येथील एका खासगी रुग्‍णालयात नेण्‍यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे आधुनिक वैद्यांनी घोषित केले. (गणेशोत्‍सव हा धार्मिक उत्‍सव असल्‍याने गणेशोत्‍सव मंडळांनी तो सात्त्विक पद्धतीनेच कसा साजरा होईल ? ते पाहिले पाहिजे. ‘डीजे’सारखी मोठा आवाज करणारी ध्‍वनीयंत्रणा वापरून आपणच उत्‍सवांचे पावित्र्य नष्‍ट करत आहोत, हेही मंडळांनी लक्षात घेतले पाहिजे. त्‍याही पुढे जाऊन अशातून झालेल्‍या तरुणाच्‍या मृत्‍यूचे दायित्‍व आता कोण घेणार ? – संपादक)

वास्‍तविक ‘डीजे’वर बंदी असतांना ते लावणार्‍या मंडळांवर पोलीस प्रशासन का कारवाई करत नाही ? असा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्‍थित केला जात आहे.