आगामी काळातील सार्वजनिक सण, उत्‍सव मंगलमय वातावरणात, शांततेत साजरे करा ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागरिकांना आवाहन !

छत्रपती संभाजीनगर – सार्वजनिक गणेशोत्‍सव हा राज्‍यातील मोठा उत्‍सव आहे. आगामी काळातील येणारे सर्व सण आणि उत्‍सव जल्लोषात, गुण्‍यागोविंदाने, भक्‍तीभावाने आणि मंगलमय वातावरणात कोणतेही गालबोट न लागता साजरे करावेत, असे आवाहन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘श्री गणेश महासंघ उत्‍सव समिती’च्‍या निराला बाजार येथील संपर्क कार्यालयाचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते उद़्‍घाटन करण्‍यात आले. त्‍या प्रसंगी ते बोलत होते.

मुख्‍यमंत्री शिंदे म्‍हणाले की, श्री गणेश महासंघ हा ९९ वर्षांपूर्वी स्‍थापन झाला असून याला एक ऐतिहासिक परंपरा आहे. आज हा महासंघ सलग ९९ वर्र्षे गणेशोत्‍सव साजरा करत असून आपली संस्‍कृती आणि परंपरा पुढे नेण्‍याचे काम या माध्‍यमातून होत आहे, असे सांगून त्‍यांनी महासंघाचे अभिनंदन केले.

‘स्‍वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्‍य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्‍सव साजरे करण्‍यास प्रारंभ केला. आपले सरकार आल्‍यानंतर सार्वजनिक गणेशोत्‍सव निर्बंधमुक्‍त साजरा करण्‍याचा निर्णय घेतला. आगामी गणेशोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर बैठक घेत या वर्षीपासून गणेशोत्‍सवात शासन नियम आणि कायदा यांचे पालन करणार्‍या मंगलमय वातावरणात गणेशोत्‍सव साजरा करणार्‍या उत्‍कृष्‍ट गणेशोत्‍सव मंडळांना पुढील ५ वर्षांसाठी अनुमती देण्‍याचा निर्णय घेतला आहे. या वर्षीपासून दहीहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्‍यात आला आहे, असे मुख्‍यमंत्री शिंदे यांनी सांगितले.