छत्रपती संभाजीनगर येथे आदर्श पतसंस्थेच्या खातेधारकांचा मोर्चा !
छत्रपती संभाजीनगर – येथील ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील आदर्श पतसंस्थेच्या खातेधारकांनी १६ सप्टेंबर या दिवशी मोर्चा काढला. पोलिसांनी या मोर्च्याला अनुमती नाकारली होती. तरीही हा मोर्चा काढण्यात आला, तसेच मोर्च्यात सहभागी महिलांनी बॅरिकेट्स तोडून मंत्रीमंडळाची बैठक चालू असलेल्या सभागृहाकडे कूच केले. या वेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. या वेळी पोलिसांनी आम्हाला लाठीने मारले आहे, असा आरोप मोर्च्यात सहभागी महिलांनी केला आहे.
आदर्श पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. यात सत्ताधारी मंत्र्यांचाही हात असल्याने या प्रकरणात कारवाई होत नाही, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यामुळे एकही मंत्री मोर्चेकारांना भेटण्यासाठी येण्यास सिद्ध नाही. मंत्रीमंडळातील एकाही मंत्र्याला सर्वसामान्य लोकांना भेटण्यासाठी वेळ नाही, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. (घोटाळ्याच्या प्रकरणी जनतेला आंदोलन का करावे लागते ? – संपादक)
आरोपीची संपत्ती विकून ठेवीदारांना त्यांचेपैसे परत करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
छत्रपती संभाजीनगर – आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणी खासदार जलील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी एकनाथ शिंदे यांनी आरोपीची संपत्ती विकून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करणार आहे, असे आश्वासन दिले.