सोलापूरचे जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. धनंजय पाटील यांच्‍यावर गुन्‍हा नोंद !

रुग्‍णालय आणि बंगला यांचे बांधकाम करतांना नगर परिषदेच्‍या नियमांचे पालन न केल्‍याचे प्रकरण !

सोलापूर – धाराशिवचे तत्‍कालीन आणि सोलापूरचे विद्यमान जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. धनंजय पाटील यांच्‍यावर धाराशिव येथील आनंदनगर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. समर्थनगरमध्‍ये खासगी रुग्‍णालय आणि बंगल्‍याचे बांधकाम करतांना नगर परिषदेच्‍या नियमांच्‍या अटी अन् नियम यांचे पालन केले नाही, तसेच नियमापेक्षा अधिक बांधकाम केले म्‍हणून या गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

१. या रुग्‍णालयासाठी चटई क्षेत्र (फ्‍लोअर स्‍पेस इंडेक्‍स) सोडण्‍यात आले नाही. वाहनतळासाठी जागा सोडण्‍यात आली नाही, तसेच पालिकेकडून काम पूर्णत्‍वाचा दाखलाही घेतला नाही.

उभारण्यात आलेली इमारत (छायाचित्र सौजन्य : धाराशिव लाइव)

२. या संदर्भातील तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी नगर परिषदेकडे केल्‍यानंतर प्रशासनाने डॉ. धनंजय पाटील यांना नोटीस बजावली होती. (जी गोष्‍ट सर्व यंत्रणा हाताशी असलेल्‍या प्रशासकीय यंत्रणेच्‍या लक्षात येणे अपेक्षित आहे, ती गोष्‍ट माहिती अधिकार कार्यकर्त्‍यांना तक्रार करून लक्षात आणून का द्यावी लागते ? अशा प्रसंगात प्रशासन नेमके काय करते ? असा प्रश्‍न नागरिकांच्‍या मनात उपस्‍थित होतो ? – संपादक)

३. धाराशिवमध्‍ये अनेक आधुनिक वैद्यांनी शहरात मोठी रुग्‍णालये बांधण्‍यात आली असून त्‍याचे बांधकाम करतांना पालिकेने दिलेल्‍या नियम आणि अटी यांचे पालन केलेले नाही. त्‍या संदर्भात लवकरच तक्रार करणार असल्‍याचे माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांसी सांगितले. (प्रत्‍येक गोष्‍टीची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्त्‍यांनीच करायची असेल, तर जनतेच्‍या कररूपातून वेतन घेणारे प्रशासकीय अधिकारी नेमके काय काम करतात ? – संपादक)